पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – सन 2021-22 व 2022-23 मध्ये झालेल्या विविध खेळांच्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विविध क्रीडा स्पर्धामध्ये प्राविण्य प्राप्त आणि सहभागी झालेल्या शहरातील खेळाडूंचा महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. अशा खेळाडूंनी महापलिकेच्या संकेतस्थळावरुन अर्जाची प्रत डाऊनलोड करुन हा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 10 जून पर्यंत सादर करावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी केले आहे.
शहरातील यशस्वी खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यास त्यांना भविष्यात दैदिप्यमान कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असा यामागील उद्देश आहे. पिंपरी चिंचवड शहराला क्रीडानगरी म्हणून लौकिक मिळवून देण्याच्या दृष्टीने तसेच शहरातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. पिंपरी चिंचवड शहराचा जगात उद्योगनगरी म्हणून नावलौकिक आहे. आता या शहराला क्रीडाभूमी म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने शहरात विविध क्रीडासंबंधी उपक्रम राबिण्यात येत आहेत.
त्याअनुषंगाने शहरात नुकतेच महापालिका आणि सीएमई यांच्या संयुक्त विद्यमाने रोईंग प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात आली असून याठिकाणी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना रोईंग खेळाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मागील वर्षी महापालिकेच्या वतीने नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास मैदानावर राष्ट्रीय पातळीवर हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे हॉकी इंडियाच्या वतीने महापालिकेला आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी देऊ केली आहे. थेरगांव येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीच्या माध्यमातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होत आहेत.
तसेच शहरातील कुस्तीगीरांना शास्त्रीय प्रशिक्षण देण्यासाठी भोसरी येथे मारुतराव लांडगे आंतरराष्ट्रीय निवासी कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर याठिकाणी आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण केंद्रही उभारण्यात येत आहे. या माध्यमातून शहरात विविध क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने खेलो इंडिया, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित आंतरविद्यापीठ (राष्ट्रीय) स्तरावर सहभागी झालेले शहरातील विद्यार्थी, खेळाडू तसेच क्रीडा संघटनेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद, आंतरराष्ट्रीय विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त व सहभागी झालेल्या शहरातील खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राविण्यप्राप्त आणि सहभागी खेळाडूंनी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून अर्ज भरावयाचा आहे. या अर्जासोबत खेळाडूने सन 2021-22 व 2022-23 मधील खेळाच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत, आधार कार्डाची छायांकित प्रत, रहिवासी पुराव्यासाठी खेळाडूंच्या नावासह रेशनकार्डाची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्र जोडणे बंधनकारक असेल. संबंधितांनी अर्ज 7 जून ते 10 जून 2022 पर्यंत क्रीडा विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, स.नं. 165 / 2, 15 प्रेमलोक, 1 ला मजला, प्रेमलोक पार्क बस स्टॉप समोर, चिंचवड पुणे येथे सादर करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.