वाकड, ताथवडेतील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची धडक कारवाई

0
349

वाकड, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने वाकड-हिंजवडी, ताथवडेतील अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, टप-यांवर धडक कारवाई सुरु केली आहे. आज (मंगळवारी) सकाळपासून ही कारवाई सुरु आहे. कारवाई यापुढेही सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कारवाईला सहकार्य करावे, असे आवाहन उपअभियंता विजय भोजने यांनी केले आहे.

दोन दिवसांपासून वाकड भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे. भूमकर चौक ते ताथवडे सब-वेच्या दोन्ही बाजू, वाकड-हिंजवडी रस्याच्या दोन्ही बाजूच्या अनधिकृत बांधकामावर, पत्राशेड, टपरी यावर धडक कारवाई केली जात आहे.

सकाळपासून कारवाई सुरु आहे. कारवाई पुढेही सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी साहित्य घराबाहेर काढून आपले नुकसान टाळावे. कारवाईला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.