नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर देशांचा निषेध सुरूच आहे. आतापर्यंत १५ देशांनी अधिकृतपणे भारताचा निषेध नोंदवलाय. मात्र, शर्मांच्या वक्तव्यातून सरकारचा दृष्टिकोन दिसून येत नसल्याचं भारतानं स्पष्ट केलंय. भाजपनं प्रवक्त्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केलंय.
भारताविरोधात निदर्शनं करणाऱ्या देशांमध्ये इराण, इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहरीन, मालदीव, लिबिया, इंडोनेशिया आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. याशिवाय भारतातील भाजप प्रवक्त्यांविरोधात विरोधी पक्ष सातत्यानं नाराजी व्यक्त करत आहेत. शर्मा यांना अटक करण्याची मागणी होत आहे.
हे प्रकरण वादग्रस्त आणि खोडसाळं असल्याचं लक्षात आल्यानंतर ओआयसीनं ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यापैकी एक ट्विटमध्ये त्यांनी भारतातील सत्ताधारी पक्षाच्या एका व्यक्तीनं पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार टीका केलीय. ओआयसीच्या वतीनं भारतात मुस्लिमांविरोधातील हिंसाचारात वाढ झाल्याचं सांगण्यात आलंय. ओआयसी मोहम्मद पैगंबर यांच्या केलेल्या कोणत्याही प्रकारच्या अपमानावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन करते. जे काही पक्ष मुस्लिमांयाविरुद्ध हिंसाचार आणि द्वेषपूर्ण गुन्ह्यांना प्रोत्साहन देतात, त्यांना जबाबदार धरले पाहिजे, असंही एका ट्विटमध्ये म्हटलंय.










































