शिवेसेनेचे धक्कातंत्र, सचिन अहिर आणि नंदुरबारमधील आमशा पाडवी यांना संधी

0
447

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या १० पैकी भाजपकडे चार जागांवर निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी मते आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसकडे एका जागेवर निवडून येण्यासाठी लागणारी मते आहेत. त्यामुळे दहाव्या जागेवरील लढत चुरशीची होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेकडून पुणे संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि नंदुरबारमधील पक्षाचे नेते आमशा पाडवी यांना संधी देईल, अशी माहिती समोर येत आहे.

राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली होती. एका सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी मिळाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. अशातच विधानपरिषदेसाठी शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची नावे चर्चेत असताना नंदुरबारमधील आमशा पाडवी यांचे नाव समोर आलं आहे.

उमेदवारीसाठी नाव चर्चेत आल्यानंतर काय म्हणाले आमशा पाडवी?
मी गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने पक्षाचं काम करत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला संधी देण्याचा निर्णय घेतला असून याबाबत मला पक्षाचे नेते संजय राऊत यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया आमशा पाडवी यांनी दिली आहे.

विधानपरिषदेसाठी किती मतांची आवश्यकता?
विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला २७ मतांची आवश्यकता आहे. भाजप आणि मित्रपक्ष यांचं संख्याबळ ११३ इतकं होत असल्यामुळे भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात. दुसरीकडे, महाविकास आघाडीतून शिवसेना आणि राष्ट्रवादीचेही प्रत्येकी दोन आमदार विधान परिषदेत जातील. तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येईल. त्यानंतरही ज्यांच्याकडे पहिल्या पसंतीची मतं शिल्लक राहतील त्यांना दुसऱ्या उमेदवारासाठी १२ मतांची तजवीज करावी लागणार आहे.