दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या आठवणी चिरकाल टिकतील : खा. श्रीरंग बारणे

0
397

जवाहर कोटवाणी यांना ” पिंपरी चिंचवड भूषण” पुरस्कार प्रदान

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी गावचे सरपंच ते महानगरपालिकेचे महापौर हा राजकीय प्रवास करीत असताना सामाजिक क्षेत्रात देखील आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणारे दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या आठवणी चिरकाल टिकतील. जनमाणसात मिसळणारे, कार्याचा, कर्तृत्वाचा वेगळा ठसा असणारे वाघेरे पाटील यांचा नम्र स्वभावाचा आणि सामाजिक कार्याचा वसा त्यांची पुढची पिढी तेवढ्याच जबाबदारीने चालवित आहे असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या ३६ व्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी कॅम्प येथील सामाजिक कार्यकर्ते जवाहर किशनचंद कोटवाणी यांना “पिंपरी चिंचवड समाजभूषण” पुरस्कार खा. बारणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सोमवारी ( दि.६ जून) पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमापूर्वी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी गावातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच नवमहाराष्ट्र विद्यालयात रक्तदान शिबिराचे आणि मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत तपासणी करून चष्म्याचा नंबर काढून देण्यात आला.

यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नाना काटे, दत्तात्रय वाघेरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, माजी महापौर सुमनताई पवळे, संजोग वाघेरे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, डब्बू आसवानी, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे, संतोष कुदळे, निकिता कदम, श्यामाताई शिंदे, उषाताई वाघेरे, माई काटे, अरुण बोऱ्हाडे, मोहम्मद भाई पानसरे, रामआधार धारिया, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघेरे, यशवंत साखरे, शिवाजी वाघेरे, काळूराम साखरे, उषा मुंडे, फजल शेख, वर्षा जगताप, दत्तोबा नाणेकर, यशवंत साखरे, बाळासाहेब वाघेरे, विजय नखाते, तुकाराम कदम, अंकुश वाघेरे, बीपीन नानेकर, संदीप गव्हाणे, प्रवीण कुदळे, महेश जाचक, शिवाजी माने, नाना कांबळे आदींसह पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

जवाहर किशनचंद कोटवानी हे पिंपरीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना या वर्षीचा दिवंगत महापौर भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानचा “पिंपरी चिंचवड समाजभूषण” पुरस्कार देण्यात आला.

यावेळी खा. बारणे म्हणाले की, कै. भिकू वाघेरे यांच्या कार्याचा आदर्श जपणाऱ्या योग्य व्यक्तींचा सन्मान प्रतिष्ठान दरवर्षी करते हे कौतुकास्पद आहे.

यावेळी महापौर ढोरे म्हणाल्या की, दिवंगत महापौर भिकू वाघेरे पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शहराच्या विकासात सिंहाचा वाटा आहे. समाजातील गरजूंना उपेक्षितांना वेळोवेळी मदत करणे हा त्यांचा आदर्श संजोग वाघेरे पाटील पुढे जपत आहेत. माजी आमदार ऍड.गौतम चाबुकस्वार म्हणाले की, दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांनी पिंपरीतील जे. जे. ग्लास आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शेकडो युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. पिंपरी गावातील शाळेचा पुनर्विकास व रयत शिक्षण संस्थेची वाढ वाघेरे पाटील यांच्या कार्यकाळात झाली.

प्रास्ताविक करताना संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले की, प्रतिष्ठानने यापूर्वी रुस्तम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, माजी महापौर आर. एस. कुमार, राष्ट्रीय खेळाडू गोपाळ देवांग, डॉ. रामचंद्र देखणे, राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, ज्येष्ठ कामगार नेते जे.सी. पिल्ले, शहाजी माने, कोरोना काळात अविरत सेवा करणारे डॉ. रोहन काटे, डॉ. विनायक पाटील यांचाही “पिंपरी चिंचवड समाज भूषण” पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. तसेच पर्यावरणाविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण या उद्देशाने उपस्थित नागरिकांना कापडी पिशव्या देण्यात आल्या आणि मावळ येथील सहारा वृद्धाश्रमास कोरडा शिधा वाटप करण्यात आला. त्याच बरोबर पुनम जाचक, हभप संदेश गोलांडे, प्रभू तीर्थनी, दिपक लोहाना आदिंचाही विशेष सन्मान करण्यात आला.