आता रेल्वेतून सामान नेण्यावर असणार मर्यादा…

0
274

देश,दि.०६(पीसीबी) – रेल्वे प्रवास करताना अनेकांकडे कित्येक बॅगा दिसतात. कोणी गावाहून धान्याची पोती आणतो, तर कोणी फळांच्या पेट्या. इतकंच काय अगदी गॅस सिलिंडर, ज्वलनशील रसायने, फटाके, अॅसिड, दुर्गंधीयुक्त वस्तू, चामडे, वंगण असं काही काही घेऊन अनेक जण रेल्वे प्रवास करीत असतात.

पण, आता असा प्रवास करता येणार नाही. विमानाप्रमाणेच रेल्वेतूनही आता सामान नेण्यावर मर्यादा आणल्या आहेत. तसेच ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. रेल्वेने नुकतेच याबाबतचे नियम जारी केले असून, सक्तीनं नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. नियम मोडणाऱ्यावर थेट कारवाई केली जाणार आहे.

रेल्वेच्या नव्या नियमानुसार, आता ट्रेनमधून प्रवास करताना, प्रवाशांना फक्त 40 ते 70 किलो सामान नेता येईल. त्यापेक्षा जास्त सामान न्यायचे झाल्यास प्रवाशांना त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. रेल्वेच्या डब्यानुसार सामानाचे वजनानुसार वेगवेगळे दर ठरवण्यात आले आहेत.

रेल्वेच्या नव्या नियमानुसार, 40 किलो सामानासह प्रवाशांना ‘स्लीपर क्लास’मधून प्रवास करता येईल. ‘एसी टू टायर’मध्ये 50 किलो सामान प्रवाशांना सोबत नेता येणार आहे. ‘फर्स्ट क्लास एसी’मधून प्रवास करताना 70 किलोपर्यंत सामान नेण्याची सूट आहे. रेल्वे मंत्रालयाने ट्विट करून याबाबतची माहिती देतानाच रेल्वे प्रवासात जादा सामानासह प्रवास करु नये, असा सल्लावजा इशाराच देण्यात आला आहे. ‘अतिरिक्त सामान घेऊन ट्रेनने प्रवास करू नका, तुमच्याकडे जास्त सामान असेल, तर पार्सल ऑफिसमध्ये जाऊन त्याची बुकींग करा..’ असं आवाहन रेल्वेने केलंय.

एखादा प्रवासी 40 किलोपेक्षा जास्त सामान घेऊन 500 किमी पेक्षा जास्त अंतराचा प्रवास करीत असल्यास 109 रुपये ‘लगेज फी’ भरावी लागेल. मात्र, हे शुल्क न भरता, सामानासह प्रवास करताना पकडल्यास ‘लगेज फी’च्या सहा पट, म्हणजे तब्बल 650 रुपये दंड होऊ शकतो.

तसेच, रेल्वेतून काही वस्तूंची वाहतूक करण्यास पूर्णपणे मनाई आहे. त्यात गॅस सिलिंडर, रॉकेल किंवा ज्वलनशील पदार्थ, फटाके, अॅसिड अशा वस्तू नेता येत नाही. या वस्तूंसह पकडले गेल्यास, रेल्वे कायद्याच्या कलम 164 अन्वये प्रवाशांविरुद्ध रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार आहे..