भाजपचे माजी नगरसेवक बाबू नायर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
426

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – भाजपचे माजी नगरसेवक, पक्षाचे शहर सरचिटणीस बाबू नायर यांनी आज (गुरुवारी) भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर शिर्डीत जाऊन पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रभारी एच. के.पाटील आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

काँग्रेसचे महासचिव के.सी.वेणूगोपाल आणि माजी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाल्यानंतर नायर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला. नायर यांनी आज दुपारी
शहर भाजपच्या सरचिटणीसपदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी शिर्डीत सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात जात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष कैलास कदम, शहर सरचिटणीस सजी वर्कि आदी उपस्थित होते.

काँग्रेसकडून ते महापालिकेत स्वीकृत नगरसेवक देखील होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
बाबू नायर हे उच्चशिक्षित, शांत, संयमी आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या केरळ मधील लोकांचा त्यांना मोठा पाठिंबा आहे. नायर यांनी भाजप सरचिटणीस पदावर काम केले. 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली. त्यानंतर भाजपने नायर यांना स्वीकृत नगरसेवक केले. परंतु, नायर यांनी आज शहर भाजपच्या सरचिटणीसपदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेस मध्ये प्रवेश केला.