पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय चे दंतरोग विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची डॉक्टरेट (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली आहे. डॉ. यशवंत इंगळे यांनी दंत शास्त्रामध्ये “स्टडी ऑफ मायनर सलायव्हेरी ग्लॅडस् सलायव्हा फ्लो रेट एपिथेलियल ऍट्रॉफी अँड रेयर इफेक्ट्स ऑन बर्निंग सेन्सेशन इन ओरल सबम्युकस फायब्रोसिस” (“Study of minor salivary glands, salivary flow rate, epithelial atrophy and their effect on burning sensation in oral submucous fibrosis”) या विषयावर प्रबंध सादर केला होता.
त्यांना डॉ. सचिन सरोदे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. के. के. जाधव यांनी बुधवारी ( दि. १ जून) डॉ. यशवंत इंगळे यांना पीएचडीचे प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. डॉ. यशवंत इंगळे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दंत आणि मुख शल्य चिकित्सक , विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. डॉ.यशवंत इंगळे यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हजारो रुग्णांवर चेहऱ्याच्या व जबड्यांच्या हाडांच्या अनेक उत्तमोत्तम आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. यामध्ये कोविड पश्चात होणाऱ्या म्युकर मायकोसिस या आजारामध्ये जबड्याच्या हाडांमध्ये प्रादुर्भाव झालेल्या सर्वच रुग्णांच्या अत्यंत जोखमीच्या आणि कठीण शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. राज्यभरातून या प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी रुग्ण यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात येत असतात. यामुळे आपल्या महापालिकेचा आणि रुग्णालयाचा लौकिक वृंद्धीगत झाला आहे. डॉ. यशवंत इंगळे यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत आणि ते इंडियन डेंटल अससोसिएशनचे पिंपरी चिंचवड शहर माजी अध्यक्ष आणि
आजीव सदस्य आहेत. त्यांना देशपातळीवरील “आउट स्टँडिंग डेंटिस्ट” तसेच “बेस्ट डेंटिस्ट अवॉर्ड” हे पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. इंगळे यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या नाव लौकिकात भर घातलेली आहे. याबद्दल महानगरपालिकेने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते डॉ. इंगळे यांचा सन्मान केला आहे.