6 हजार विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

0
228

पिंपरी दि. २१ (पीसीबी) – ‘स्वच्छता के दो रंग’ या अभियानाअंतर्गत ज्ञानदिप विद्यालय रूपीनगर- तळवडे, म्हाळसाकांत विद्यालय- आकुर्डी, श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, यशस्वी इंग्लीश मिडीअम स्कूल मोशी, सरस्वती विद्यालयामधील सुमारे 6 हजार विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. प्रसंगी, विद्यार्थ्यांनी स्वत:च्या घरी कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा हिरव्या डस्टबीनमध्ये आणि सुका कचरा निळ्या डस्टबीनमध्ये संकलित करणार असल्याचे पालकांच्या स्वाक्षरीचे प्रतिज्ञा पत्र स्मार्ट सिटी टीमकडे सुपूर्त केले.

शहर कचरामुक्त व कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होण्याकरीता नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने ‘स्वच्छता के दो रंग’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ‍पिंपरी-चिंचवड महापालिका, स्मार्ट सिटी व स्मार्ट सारथी यांच्यावतीने शाळा, महाविद्यालयांद्वारे जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून “स्वच्छतेचे दोन रंग- ओला कचरा – हिरवा रंग- सुका कचरा – निळा रंग” याबाबत नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे.

यावेळी, ज्ञानदीप विद्यालय रूपीनगरचे प्राचार्य सचिव शांताराम भालेकर, खजिनदार दशरथ जगताप, संस्थेचे कार्याध्यक्ष भागवत चौधरी, प्राचार्य सुबोध गलांडे, शिक्षक सुहास चौधरी. म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डीचे प्राचार्य सुनील लाडके, अशोक आवारी, खुशालदास गायकर, सुधीर रोकडे, सिंधू मोरे, मुकुंद बोरुडे. श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विक्रम काळे, पर्यवेक्षक शशिकांत हुले व शिक्षक वर्ग. यशस्वी इंग्लीश मिडीअम स्कूल मोशीचे मुख्याध्यापक शोभा देवकाते, संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवकाते, शिक्षीका कांचन पवार, रोहीदास बिंदळे, भाग्यश्री भुजबळ. सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य श्रीम. दातीर व शिक्षक वर्ग यांच्यासह आरोग्य निरीक्षक, स्मार्ट सिटी व स्मार्ट सारथी टीमचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

“मला ओला आणि सुका कचरा यांच्या वर्गीकरणाचे महत्त्व समजले आहे. मी आजपासून स्वत:चे घर, व्यवसायाचे ठिकाण येथेच कचरा वर्गीकरण करेन. ओला कचरा हिरव्या तर कोरडा कचरा निळ्या डस्टबीनमध्ये टाकून पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान देईन”. अशी शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली.