6 महिन्यांनंतर सोनम वांगचुक यांची सुटका, केंद्राचा मोठा निर्णय

0
1

दि१४(पीसीबी)-लडाखमधील प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची अखेर जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांच्या नजरकैदेचा आदेश रद्द करत सुटकेचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.

केंद्र सरकारने सांगितले की, लडाखमध्ये शांतता, स्थिरता आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विविध समुदायांशी संवाद साधून परिस्थिती सुरळीत करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचेही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले.

NSA अंतर्गत झाली होती अटक

सोनम वांगचुक यांना 26 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) अटक करण्यात आली होती. त्याआधी 24 सप्टेंबर 2025 रोजी लेहमध्ये हिंसक आंदोलनानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली होती.

अटकेनंतर वांगचुक यांना राजस्थानमधील जोधपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते आणि त्यांनी सुमारे सहा महिने कारागृहात घालवले आहेत.

राज्याच्या मागणीवरून आंदोलन

लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी गेल्या वर्षी लेहमध्ये मोठे आंदोलन झाले होते.

या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला तर 160 हून अधिक लोक जखमी झाले होते. या हिंसाचाराला वांगचुक यांनीच प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवत त्यांना NSA अंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते.

आंदोलनांचा परिणाम

गृह मंत्रालयाच्या मते, लडाखमध्ये सुरू असलेले बंद, आंदोलन आणि निषेध यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि रोजगार क्षेत्रालाही याचा फटका बसल्याचे सरकारने नमूद केले.

म्हणूनच सर्व घटकांशी संवाद साधून शांतता आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी वांगचुक यांची नजरकैद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी

दरम्यान, वांगचुक यांच्या पत्नी आंगमो यांनी त्यांच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणावर 17 मार्च रोजी सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच केंद्र सरकारने त्यांच्या सुटकेचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे लडाखमधील आंदोलन, सहाव्या अनुसूचीची मागणी आणि केंद्राशी संवाद यावर पुढे काय परिणाम होतो, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे