चिंचवड, दि.२६(पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत 50.47 टक्के मतदान झाले. सन 2019 च्या निवडणुकीत 53.59 टक्के मतदान झाले होते.
चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून नाना काटे तर अपक्ष राहुल कलाटे यांच्यासह 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्वांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात 3.52 टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळी 9 ते 11 या दरम्यान 10.45 टक्के मतदान झाले.
दुपारी 1 वाजेपर्यंत 20.68 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर 3 वाजेपर्यंत 30.35 टक्के मतदान झाले. तर, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 41.06 टक्के मतदानाची नोंद झाली. दिवसभरात 50.47 टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. दुपारनंतर मतदानाच्या आकडेवारीत वाढ झाली. एकूण 50.47 टक्के मतदान झाले. मतदान (ईव्हीएम) यंत्रे थेरगाव येथील स्व.शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे ठेवण्यात आली आहेत. 2 मार्च रोजी तेथेच मतमोजणी होणार आहे.