चिंचवडमध्ये ५ लाख ६८ हजार ९५४ तर, कसब्यात २ लाख ७५ हजार ६७९ मतदार

0
265

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – पुणे जिल्हयातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ (क्र. २०५) तर कसबा विधानसभा मतदारसंघ (क्र. २१५) येथे २६ फेब्रुवारी २०२३ रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर त्यांचा निकाल २ मार्च २०२३ रोजी लागणार आहे. चिंचवड मतदार संघामध्ये एकूण मतदारांची संख्या ५ लाख ६८ हजार ९५४ इतकी आहे त्यापैकी ३ लाख ०२ हजार ९४६ पुरुष, २ लाख ६५ हजार ९७४ स्त्री व ३४ तृतीय पंथी मतदार आहेत. या एकूण मतदारांमध्ये १२ हजार ३१३ दिव्यांग मतदार व ८० वर्षावरील ९ हजार ९२६ मतदार समाविष्ट आहेत. तसेच, ३३१ अनिवासी भारतीय, १६८ सैनिक मतदार या निवडणूक प्रकियेत सहभागी होणार आहेत.

कसबा पेठ मतदार संघामध्ये एकूण मतदारांची संख्या २ लाख ७५ हजार ६७९ इतकी असून त्यापैकी १ लाख ३६ हजार ९८४ पुरुष, १ लाख ३८ हजार ६९० स्त्री व ५ तृतीय पंथी मतदार आहे. या एकूण मतदारांमध्ये ६ हजार ५७० दिव्यांग मतदार व ८० वर्षावरील १९ हजार २४४ मतदार समाविष्ट आहेत. तसेच, ११४ अनिवासी भारतीय, ३८ सैनिक मतदार या निवडणूक प्रकियेत सहभागी होणार आहे.

या मतदान प्रकियेसाठी चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये ५१० व कसबा पेठ विधानसभा मतदार संघामध्ये २७० मतदान केंद्र सज्ज झालेली आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये १३ व कसबा पेठ विधानसभा मतदार संघामध्ये ९ मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. दोन्ही मतदार संघात एकूण मतदान केंद्राच्या १० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार असून त्यात या संवेदनशील मतदान केंद्राचा समावेश करण्यात आला आहे.

या निवडणूक प्रकियेच्या संचालनाच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी मा. भारत निवडणूक आयोगामार्फत दोन सर्वसाधारण निरिक्षक, दोन पोलिस निरिक्षक व दोन खर्च निरिक्षकांची नेमणूक केलेली असून, ते सर्व दि. ०६-०२-२०२३ रोजी पुण्यात दाखल झालेले आहेत.

दोन्ही मतदार संघात निवडणूक प्रकिया पार पाडण्यासाठी आवश्यक असलेला अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन घेण्यात आलेला असून चिंचवड मतदार संघाकरिता २ हजार ५५० व कसबापेठ मतदार संघाकरिता १ हजार ३५० मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. चिंचवड मतदारसंघामध्ये ४७ व कसबापेठ मतदारसंघामध्ये २५ झोनल अधिकाऱ्यांची तसेच संवेदनशिल मतदान केंद्रासाठी चिंचवडमध्ये १५ व कसबापेठ मतदारसंघात ११ सूक्ष्म निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

पोट निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच, निवडणूक प्रकिया शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी चिंचवड मतदारसंघाकरिता CRPF, CISF, ITBP च्या प्रत्येकी १ कंपनी RPF च्या २ कंपन्या दाखल झालेल्या आहेत. तसेच, कसबा पेठ मतदारसंघाकरिता CAPF च्या ५ कंपन्या दाखल झालेल्या आहेत. या शिवाय पुणे शहर पोलिस विभागाकडून कसबा पेठसाठी १५०० पोलीस तर पिंपरी चिंचवड पोलीस विभागाकडून चिंचवड मतदारसंघासाठी ८३६ पोलीस व १६९ होमगार्ड मार्फत बंदोबस्त पुरविला जाणार आहे.

या पोट निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर तसेच दोन्ही मतदारसंघ स्तरावर आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून, चिंचवड मतदारसंघात १२ FST, ७ SST, ६ VST व १ VVT Team तसेच, कसबापेठ मतदार संघात ९ FST, ९ SST, २ VST व १ VVT Team ची नियुक्ती करण्यात आलेली असून, दोन्ही मतदारसंघात सदर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे.