40 लाखाच्या लाच प्रकरणी उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर, FIR दाखल

0
326

नाशिक, दि. २९ जून (पीसीबी) – तब्बल 50 लाखाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 40 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून ती लाच स्विकारण्याची तयारी दाखविल्याप्रकरणी नाशिक जिल्हयातील दिंडोरी उपविभागातील उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार (37, रा. स्वामी बंगला, शासकीय विश्रामगृह दिंडोरी, जि. नाशिक) यांच्याविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे . 40 लाखाच्या लाच प्रकरणी उपविभागीय अधिकार्‍याविरूध्द गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत मुंबईतील 57 वर्षीय व्यक्तीने नाशिकच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी दि. 22 मे 2023 रोजी लाचेची मागणी केली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रार यांची दिंडोरी येथे कंपनी असून त्यांचे कंपनीचे बांधकाम करताना त्यांनी अकृषीक परवानगीं न घेतल्याने त्यांचे कंपनीस आलोसे यांचेकडून नोटीस बजावण्यात आलेली होती. तसेच कंपनीचे उत्पादन बंद करण्याबाबत तोंडी सांगितलेले होते. सदर कंपनीवर कारवाई न करण्यासाठी तसेच बंद कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50 लाखाची मागणी केली, तसेच तडजोडी अंती 40 लाख रुपयेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दाखविली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार, पोलिस निरीक्षक संदिप साळुंखे, पोलिस हवालदार डोंगरे, पोलिस हवालदार इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.