4 जूनला याच हातांनी मी मुंडेसाहेबांचे अंत्यसंस्कार केले होते

0
177

दि ११ मे (पीसीबी ) बीड : मराठवाड्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंसाठी आज उदयनराजे भोसले व अजित पवारांनी सांगता सभा घेतली. यावेळी, भाऊ धनंजय मुंडे हेही व्यासपीठावर होते. बीडमधील भाषणात पंकजा मुंडेंनी त्यांचे दिवंगत वडिल गोपीनाथ मुंडेंची आठवण सांगितली. बीडमध्ये 13 मे रोजी मतदान होत असून 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे. याच 4 जूनची आठवण सांगत पंकजा मुडेंनी बीडकरांना भावनिक सादही घातली. कारण, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर, 4 जून रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

मला दिल्लीला जायचं आहे, याचं पहिलं कारण मला जिंकायचं आहे आणि मी जिंकणारच आहे. मी मंत्री असताना या भागातील जी मशागत केली, येथील जी विकासकामे केली, त्याचा पुढचा टप्पा मला गाठायचा आहे. मला या भागासाठी उद्योग आणायचे आहेत, येथे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभा करायचं आहे, असे म्हणत पंकजा मुंडेनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मला निवडून द्या, असे आवाहन बीडकरांना केले. तसेच, वडिलांच्या अंत्यसंस्काराची तारीख व निकालाची तारीख एकच असल्याचे सांगत भावनिक सादही घातली.

4 जून ही आपल्या निकालाची तारीख आहे, 4 जूनला याच हातांनी मी मुंडेसाहेबांचे अंत्यसंस्कार केले आहेत. मुंडे साहेबांची सहानुभूती म्हणून मी तुम्हाला मतदान मागत नाही. मुंडे साहेबांकडे बघून मला मत द्या, असेही कुठं म्हणणार नाही. मी जी कहानी सुरू केली होती, त्या कहानीला पूर्ण करण्यासाठीच 4 जूनला निकाल आहे, असे मला वाटतं. मला विधानसभा न मागता मिळाली, मला लोकसभा न मागता मिळाली. मुंडेसाहेब या जिल्ह्यात, परळीमध्ये सत्कार घ्यायला येऊ शकले नाही, माझ्या लोकसभेमध्ये जाण्याने, तो सत्कार घेण्यासाठीच हा 4 जूनला निकाल आहे, असे मला वाटते, असे म्हणत पंकजा मुंडेंनी बीडमधील जनतेला भावनिक साद घातली.

मुंडेसाहेबांनी मंत्री होऊन देशाच्या विकासाचे स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न मी राज्यात मंत्री होऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आता, मला पुढचा टप्पा पूर्ण करायचा आहे. त्यामुळे, मला निवडून द्या. मी हात जोडते, जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका. जे तो प्रचार करतात त्यांना जाऊन विचारा तुम्ही दुसऱ्या समाजाचे मतं घेऊन निवडून येत नाहीत. तुमच्या मतदारसंघात गेल्या 6 टर्म कोण निवडून येतं, मग आमच्या जिल्ह्यात येऊन तो प्रचार का करता, असे म्हणत पंकजा मुंडेंनी नाव न घेता मनोज जरांगेंवर निशाणा साधला. तसेच, या राज्यात मराठा समाजाचे अनेक आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत,उपमुख्यमंत्री आहेत, मग एक पंकजा मुंडे गेली तर कुणाचं काय बिघडणार आहे?, असा सवालही पंकजा यांनी बीडकरांना विचारला.

मी मराठा समाजाच्या बांधवांना भेटले, प्रचारात भेटले, स्वतंत्रही भेटले. त्यावेळी, त्यांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे, ते म्हणाले आम्हाला आरक्षण पाहिजे. आरक्षण म्हणजे कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, म्हणजे तुम्हाला ओबीसी प्रमाणपत्र पाहिजे. अरे, मग मी अगोदरच ओबीसी आहे ना, तुमच्याचसाठी मी आहे. एखादं नेतृत्व तयार व्हायला 50 वर्षे लागतात. त्यामुळे, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही मला निवडून द्या, जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका, असे आवाहन पंकजा यांनी केले.

मुस्लीम बांधवांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. भुलथापा देऊन वेगळाच प्रचार केला जातोय. मात्र, मी मुस्लीम बांधवांना सांगते, कुणाच्या केसालाही धक्का लागणार नाही, ही माझी गॅरंटी आहे, असे म्हणत मु्स्लीम बांधवांनाही पंकजा मुंडेंनी साद घातली.