26 माय-भगिनींचा सिंदूर पुसले गेले त्यांचा हा अपमान

0
10

दि . ११ ( पीसीबी ) – पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारताने कठोर आणि ठाम प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या नऊ दहशतवादी ठिकाणांचा यशस्वीपणे नायनाट करण्यात आला. यानंतरही पाकिस्तानने आपली नापाक कृती सुरूच ठेवली आणि भारतातील नागरी भागांवर लक्ष्य करत हल्ले चढवले. मात्र भारताने प्रत्येक वेळेस ठाम प्रत्युत्तर देत पाकिस्तानला माघारी पळवले. भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी झाली होती. या कारवायांमुळे दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं आणि युद्ध पेटण्याची शक्यता होती. मात्र, या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने हस्तक्षेप करत यशस्वी मध्यस्थी केली. दोन्ही देशांमध्ये सीजफायर घोषित करण्यात आल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

संजय राऊत म्हणाले की, ट्रम्प हे कोणत्या अधिकारात मध्यस्थी करत आहेत? भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. 140 कोटी लोकसंख्येचे महान राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो, कोणत्या आधारावर? कोणत्या अटी-शर्तीमुळे? भारताला काय मिळाले? युक्रेन आणि रशियाच्या युद्धात भाजपने जाहिरात केली होती की पापाने वॉर रुकवा दिया. मग आता अमेरिका के पापाने वॉर रुकवा दिया क्या? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पुरा बदला लेंगे ही भाषा होती. छोडेंगे नही पाकिस्तान को, तुकडे करेंगे, कुठे केले तुकडे? भारताची बेअब्रू झाली आहे. जगभरात पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वक्तव्य आलं की, आम्ही युद्ध जिंकलं. भारतासारख्या देशाला आणि देशाच्या पंतप्रधानांना हे शोभत नाही. कुठे गेले सगळे अंधभक्त? कोणत्या अटी-शर्तीवर तुम्ही ही युद्धबंदी केली? यासाठी सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला पाहिजे. त्या बैठकीला पंतप्रधान मोदींनी उपस्थित राहणे गरजेचे आहे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, पंतप्रधानांना पळ काढता येणार नाही. युद्धबंदीची खरच गरज होती का? लाहोर ताब्यात आलं, कराची ताब्यात आलं, इस्लामाबादमध्ये बॉम्ब टाकले, मग माघार घ्यायची गरज काय? पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवायची संधी असताना आणि भारतीय सैन्याचं मनोबल प्रचंड उंचावलेले असताना देशाच्या राजकीय नेतृत्वाने अचानक कच खाल्ली. देशाचं आणि सैन्याचा मनोबल उद्ध्वस्त केलं. ट्रम्प यांचा यात संबंध काय? एका सार्वभौम राष्ट्राच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याचा ट्रम्प यांना अधिकार काय? मिस्टर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 26/11 च्या हल्ल्यानंतर जेव्हा आपण युनोमध्ये जाऊन ओबामांशी चर्चा केली, तेव्हा हेच मोदी सांगत होते की, ओबामा के पास जाकर रो रहे है. आता मोदी काय ट्रम्पकडे जाऊन रडताय का? अमित शाह ट्रम्पकडे जाऊन रडताय का? असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

सिंदूर-बिंदूर सर्व राजकारण खोटं
या देशाच्या हुतात्म्यांचा, 26 माय-भगिनींचा सिंदूर पुसला गेला. त्यांच्या त्यागाचा केलेला हा अपमान आहे. हे सिंदूर-बिंदूर सर्व राजकारण खोटं आहे, हे मी स्पष्टपणे सांगत आहे.या क्षणी माघार घ्यायची काहीच गरज नव्हती. जेव्हा आपण एका टोकाला जाऊन पोहोचलेलो आहोत, तेव्हा कोणाच्या तरी दबावाखाली आणि कोणाला तरी फायदा होण्यासाठी युद्धबंदी जाहीर करण्यात आली. ट्रम्पला मध्यस्थी घालून भारत सरकार कोणाला वाचवत आहे? पाकिस्तानला की लाडक्या उद्योगपतीला? मुळात ट्रम्प हा कोण आहे? नुकसान भारताचे झाले आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 20 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय. ट्रम्प यांनी इस्राईल आणि गाझामधले युद्ध का थांबवलं नाही? ट्रम्प यांची मध्यस्थी जगात मान्य केली जात असेल तर गाझा पट्टी बेचिराख केली, त्यावेळी ट्रम्प ठामपणे इस्राईलच्या मागे उभे राहिले. पण यावेळी मोदींचे मित्र ट्रम्प हे भारताच्या मागे उभे राहिले नाही. दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत, असे ते म्हणाले. जगात भारताला मित्र नाही. 500 देश मोदी फिरून आलेत. भारताचा मित्र कोण हे त्यांनी सांगावं, असेही संजय राऊत यांनी म्हटले.