’23 जुलैला राजकारणात भूकंप होणार?’; शिवसेना नेत्याच्या वक्तव्याची जोरदार चर्चा!

0
2

दि. 20 (पीसीबी) –  शिवसेनेचे (शिंदे गट) नेते राहुल शेवाळे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शेवाळे यांनी 23 जुलैला मोठा राजकीय भूकंप होण्याचा दावा करत, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानांनंतर शेवाळे यांनी हे वक्तव्य केल्याने, राज्यातील सत्तासमीकरण आणि राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

राहुल शेवाळे यांचा मोठा दावा :

राहुल शेवाळे यांनी केलेल्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेवाळे म्हणाले की, “23 जुलैला मोठा राजकीय स्फोट होण्याची शक्यता आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसच्या दहा ते पंधरा आमदारांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी संपर्क साधला आहे.”

तसेच, त्यांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करत म्हटले की, “आपल्या पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून हे नेते अशा बातम्या पसरवत आहेत. दुसऱ्या पक्षाच्या स्थितीबद्दल बोलण्यापेक्षा, स्वतःच्या पक्षातील फुटीबाबत काळजी घ्या.” शेवाळे यांच्या या विधानामुळे सत्ताधारी गटाला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यापूर्वीच शिंदे गटात मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यांनी म्हटले होते की, “उदय सामंत शिंदे गटातून वेगळे होऊ शकतात, त्यांच्यासोबत 20 आमदार आहेत. फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वीच ही फूट पडण्याची शक्यता होती.”

राऊत यांनी भाजपवरही निशाणा साधत म्हटले की, “मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे अडून बसले होते. त्यावेळी भाजपचा वेगळा प्लॅन तयार होता.” त्यांच्या या विधानाने सत्ताधारी गटाच्या अंतर्गत हालचालींवर नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.