औद्योगिक आणि शैक्षणिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील मोहननगर, आकुर्डी प्रभाग क्रमांक १४ मध्ये महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. आकुर्डीसह दत्तवाडी, विठ्ठलवाडी, विवेकनगर, काळभोरनगर, रामनगर, मोहननगर, चिंचवड स्टेशन आणि साईबाबा नगर परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या विनाकारण वीज खंडित होण्याच्या सत्रामुळे त्रस्त झालेल्या नागरिक कृती समितीने आज आक्रमक पवित्रा घेत महावितरणच्या गणेशखिंड येथील अधिक्षक अभियंता व भोसरी डिव्हिजनच्या कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले आणि निवेदन सादर केले.
जनक्षोभाची कारणे आणि प्रमुख समस्या
निवेदनात नमूद करण्यात आलेल्या मुद्द्यांवरून महावितरणच्या भोंगळ कारभाराचे वास्तव समोर येते:
आर्थिक व व्यावसायिक फटका: वारंवार जाणाऱ्या लाइटमुळे लहान व्यावसायिकांचे, व्यापाऱ्यांचे तब्बल ५० टक्क्यांपर्यंत आर्थिक नुकसान होत आहे.
विद्यार्थी व शैक्षणिक नुकसान: शाळा आणि शिकवण्यांमधील (क्लासेस) विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोठा अडथळा निर्माण होत आहे.
आरोग्य आणि जीविताचा धोका: रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्णांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होत आहे.
आयटी कर्मचाऱ्यांची गैरसोय: ‘वर्क फ्रॉम होम’ करणारे व्यावसायिक आणि आयटी प्रोफेशनल्सना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
संवादाचा अभाव: वीज गायब झाल्यानंतर महावितरणची हेल्पलाइन व अधिकारी संपर्क क्षेत्राबाहेर किंवा अनुत्तरदायी राहत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
या धडक निदर्शनावेळी परिसरातील आजी-माजी नगरसेवक, कृती समितीचे पदाधिकारी, व्यापारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
प्रशासनाची सारवासारव : नागरिकांचा वाढता रोष आणि आक्रमक पवित्र पाहताच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दमछाक उडाली. त्यांनी शिष्टमंडळाची गाऱ्हाणी शांतपणे ऐकून घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
महावितरणचे आश्वासन: प्रभागात अतिरिक्त केबल्स टाकणे, नवीन डीपी बसवणे, ट्रान्सफॉर्मरवरील अतिभार (लोर्ड) कमी करणे, नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक, शिडी गाडी (Ladder Van) आणि केबल टेस्टिंग व्हॅनची उपलब्धता तातडीने सुनिश्चित करून वीज यंत्रणा सुरळीत केली जाईल, अशी ग्वाही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.
तीव्र आंदोलनाचा इशारा:
दरम्यान, महावितरणच्या केवळ तोंडी आश्वासनांवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर आगामी ३० दिवसांच्या आत वीज पुरवठ्यात सुधारणा करून ठोस कार्यवाही झाली नाही, तर महावितरणच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, तसेच वेळप्रसंगी कायदेशीर कारवाई करावी लागेल असा सज्जड दम नागरिक कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

