बारामतीत दादांसारखाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ‘जनता दरबार’; नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाईचे आदेश

PCB Admin
2 Min Read

दि.१३ (पीसीबी)- राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून त्यांनी आज सकाळी आपल्या ‘सहयोग’ या निवासस्थानी जनता दरबार आयोजित करत नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेतल्या. या उपक्रमामुळे बारामती तालुक्यातील नागरिकांना आपल्या अडचणी थेट मांडण्याची संधी मिळाली.सकाळी साडेआठच्या सुमारासच सहयोग सोसायटी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बारामती तालुक्यातील विविध गावांमधून नागरिक आपल्या तक्रारी आणि समस्या घेऊन येथे दाखल झाले होते. विशेष म्हणजे या जनता दरबारात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

यावेळी अनेक महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अडचणी, स्थानिक नागरी समस्या तसेच वैयक्तिक तक्रारी सुनेत्रा पवार यांच्यासमोर मांडल्या. प्रत्येक नागरिकाचे म्हणणे संयमाने ऐकून घेत सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

दरम्यान, बारामती वकील संघटनेच्या सदस्यांनीही सुनेत्रा पवार यांची भेट घेत विविध व्यावसायिक प्रश्नांवर चर्चा केली. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तत्काळ निर्णय घेतला जात असल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

याचवेळी पुण्यातील वाघोली येथे आयोजित होणाऱ्या आगामी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या आयोजकांनीही सुनेत्रा पवार यांची भेट घेत स्पर्धेचे औपचारिक निमंत्रण दिले. या प्रसंगी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील मानाच्या गदेची पूजा करण्यात आली. कुस्ती ही महाराष्ट्राची समृद्ध आणि अभिमानास्पद परंपरा असल्याचे सांगत, अशा प्रतिष्ठित स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील मल्लांना मोठे व्यासपीठ मिळते, असे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रातील कुस्ती परंपरेला नेहमीच प्रोत्साहन दिले जाईल, असे आश्वासन देत त्यांनी स्पर्धेच्या आयोजकांना शुभेच्छा दिल्या.बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारामुळे नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचण्यास मदत झाली असून स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे

Share This Article