तुमची बदली व्हायच्या आत चऱ्होली टीपी रद्द करा -अजितदादा पवार यांचे आयुक्त शेखर सिंह यांना आदेश

PCB Admin
2 Min Read

मुंबई, दि . ६ ( पीसीबी ) – चऱ्होली टीपी स्किम रद्द करण्याबाबात महापालिका आयुक्त शेखर सिंह हे सारखे चालढकल करत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज सकाळीच मुंबई गाठली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. अजितदादांनी सर्वांच्या समोर आयुक्तांना फोन लावला आणि, तुमची बदली होण्याआधी चऱ्होली ग्रामस्थांचे टीपी रद्द करण्याचे काम करून जायचे आहे, अशा स्पष्ट शब्दांत सुनावले. दुसरकीडे नगरविकास खाते ज्यांच्याकडे आहे त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही ग्रामस्थांनी गाठले आणि टीपी रद्द करण्याचे आदेश काढण्याचे आश्वासन मिळवले. लागोपाठ दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोन गेल्याने आयुक्त सिंह यांनी सोमवारी कोणत्याही परिस्थितीत टीपी रद्द केल्याचे आदेश काढतो, अशी ग्वाही दिली आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी टीपी रद्दचा आदेश मिळत नसल्याने सोमवारी ९ जून रोजी आयोजित केलेला महामोर्चा होणार असल्याचे स्पष्ट केले.
चऱ्होलीचे ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ उद्या सकाळी आयुक्त सिंह यांना भेटणार आहे. आठवड्यापूर्वी गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला तेव्हा तूर्त टीपी स्थगित केल्याचे जाहीर केले होते आता आयुक्तांना त्यांचा अट्टाहास सोडून टीपी स्किम रद्द करण्याची वेळ आली आहे.
दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांनी ठोस आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आणि आभारही मानले. मात्र, जोवर आपल्याला लेखी आदेश मिळत नाही तोपर्यंत थांबायचे नाही, लढा कायम सुरू ठेवायचा आणि सोमवारचा महामोर्चासुध्दा काढायचा असे सर्वांनी ठरवले आहे. लेखी आदेश मिळाला तर आपले आंदोलन त्याच दिवशी थांबेल. ज्या दिवशी लेखी सही शिक्क्यांचा आदेश मिळेल आणि तो अध्यादेश आपण वाघेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करणार आहोत, असे गावकऱ्यांनी ठरवले आहे.

Share This Article