पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपूलाचे काम संथ गतीने

2 Min Read

पिंपरी, दि .7 (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हाती घेतलेले पिंपरी डेअरी फार्म येथील उड्डाणपूल बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहे. या उड्डाणपुलाचे सबस्ट्रक्चर चे काम ८०% पूर्ण झाले आहे उर्वरित २०% काम हे रेल्वे विभागाशी सलग्न आहे.सुपर स्ट्रक्चर चे २५% पूर्ण झाले असून मार्च अखेर पर्यंत ५५% काम पूर्ण होणार आहे. तसेच रस्त्याचे काम ६० % झाले असून उड्डाणपुल व रस्त्याचे उर्वरित काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करून हा उड्डाणंपूल नागरिकांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, हे काम अपेक्षेपेक्षा खूप संथ गतीने सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे कामाबाबत कार्यादेश मार्च २०२३ मध्ये देण्यात आला होता. परंतु या प्रकल्पाचे कामास काही वृक्षांचा अडथळा येत होता. या पुलाच्या मान्य रेखाचित्रानुसार पुलाच्या बांधणीमध्ये अडथळा ठरणारे अस्तित्वातील जागेवरील वृक्ष काढणेविषयी , पुनर्रोपण करणेबाबत ऑगस्ट २०२३ मध्ये मंजुरी देण्यात आली. एकूण पुर्णपणे काढावयास लागणाऱ्या वृक्षांची संख्या १४२ वृक्ष इतकी होती. तसेच पुनर्रोपण करावयाच्या वृक्षांची संख्या ६४ वृक्ष इतकी होती.

पुलाच्या बांधणीने बाधित होणारे वृक्ष हे संरक्षण विभागाच्या हद्दीत असल्याने झालेल्या करारानुसार सदरच्या वृक्षांचे मुल्य संरक्षण विभागाकडे जमा केलेनंतर वृक्ष काढावयाची परवानगी संरक्षण विभागाकडून मिळणार होती. त्यानुसार या वृक्षांचे मुल्यांकन वन परिक्षेत्र अधिकारी पुणे यांचेमार्फत सप्टेंबर २०२३ मध्ये घेण्यात आले. या प्रस्तावास पाठपुरावा करुन वृक्ष काढावयाची परवानगी मार्च २०२४ मध्ये मिळाली. त्यास अनुसरुन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मे २०२४ रोजी सदरचे १४२ वृक्ष काढुन घेतले. तदनंतर त्या जागेतील पूलाच्या पायाचे काम सुरु करण्यात आले. तसेच वृक्षांच्या पुनर्रोपणाच्या सूचना संरक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार नोव्हेंबर २०२४ रोजी पुर्ण करुन घेण्यात आले. सर्व वृक्षांचे पुनर्रोपण हे संरक्षण विभागाच्या हद्दीमध्ये करण्यात आलेले आहे.

तसेच हा पूल रेल्वे विभागाशी संलग्न असल्याने रेल्वे विभागातील विविध विभागांशी समन्वय साधून सर्व विभागांची मान्यता मिळाली. त्यानंतर या पुलाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. सदरचा पूल मुदतीमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन असून त्यानंतर लोहमार्ग फाटकासमोर होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

Share This Article