भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर हल्ला

bpcauthor bpcauthor
1 Min Read

बीड, दि. 29 (पीसीबी) : भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर हल्ला करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात संगीता ठोंबरे या किरकोळ तर त्यांच्या वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास अज्ञातांकडून दगडफेक करण्याती आली. अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम आटपून संगीता ठोंबरे परत जात असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक केली आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

केज तालुक्यातील वडमाऊली दहिफळ येथे माजी आमदार संगीता ठोंबरे या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला एक कार्यक्रम आटपून केजकडे जात होत्या. त्याचवेळी त्यांच्या वाहनावर अचानक दगडफेक झाली. या हल्ल्यात चालकाच्या बाजूची काच फुटली. या हल्ल्यात संगीता ठोंबरे यांच्यासह त्यांच्या गाडीचा चालक किशोर मोरे जखमी झाले आहेत. संगीता ठोंबरे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार सुरू आहेत. हा हल्ला नेमका का करण्यात आला? याचा तपास पोलीस करत आहेत. या संदर्भात केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून हल्लेखोराचा पोलीस शोध घेत आहेत.

दगडफेक करणारा हल्लेखोर कोण होता त्याची माहिती मिळाली आहे. तसेच या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. अशी माहिती केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे. मद्यपान केलेल्या एका इसमाने ही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती वर्तविण्यात आली आहे.

Share This Article