विविध माध्यमातून व्यापक स्तरावर प्रबोधन केल्यामुळे ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीमे’ची यशस्वी सांगता !

bpcauthor bpcauthor
2 Min Read

पिंपरी, दि. 27 (पीसीबी)- राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हे भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे मानबिंदू आहेत. त्यांचा योग्य तो मान राखला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही चळवळ राबवली जाते. या चळवळीच्या अंतर्गत पुणे, पिंपरी, चिंचवड ,नाशिक रोड,जुन्नर, तळेगाव,सासवड येथील 55 हुन अधिक शाळांमध्ये निवेदन दिले. तसेच ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ याविषयी व्याख्याने घेण्यात आली, यासमवेत हस्तपत्रके वितरित करणे, भित्तीपत्रके-फ्लेक्स लावणे, स्थानिक केबल वाहिन्यांवर राष्ट्रजागृतीपर ध्वनीचकत्या (सीडी) दाखवणे, विविध ठिकाणी प्रबोधन कक्ष लावून राष्ट्रध्वजाचे महत्व विषद करण्यात आले. याशिवाय फलक लिखाण, सामाजिक माध्यमाद्वारे जनप्रबोधन करणे आदी गोष्टी करण्यात आल्या.

तसेच जिल्हाधिकारी, पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षण विभाग आदी ठिकाणीही ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ याविषयी निवेदने देण्यात आली. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी विद्यार्थ्यांकडून शाळा महा विद्यालयामध्ये प्रतिज्ञा घेण्यात आली. मुलांमध्ये राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागृत करण्यासाठी विविध शाळांमध्ये क्रांतिकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले. पुणे जिल्ह्यात ही चळवळ यशस्वी होण्यासाठी समाजातील राष्ट्रप्रेमी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा सहभाग लाभला. या चळवळीला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सासवड येथील हिंदु जनजागृतीच्या हीवरे गाव शाखेतील धर्मप्रेमींनी सासवड पोलीस ठाण्यात राष्ट्रध्वज सन्मान राखा यासंदर्भात निवेदन दिले. हे निवेदन उपनिरीक्षक ढेकळे यांनी स्विकारले. पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील 5 शाळांमध्ये राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले यामध्ये 1100 हुन अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. शाळा कॉलेज मधील सर्व विदयार्थ्यांनी विषय शांतपणे ऐकून घेतला आणि भारतमातेचा जय घोष केला. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनानेही राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही नक्की करू, असे आश्वासन दिले.

Share This Article