गुप्तधनासाठी कन्याबळी देण्याचा प्रकार, बीडमध्ये भोंदूबाबाला अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

बीड, दि. २६ (पीसीबी) – बीडमध्ये एका कुटुंबाने गुप्तधन मिळवण्यासाठी घरी पुजा करण्याचा घाट घातल्याचा प्रकार समोर आला आहे. गुप्तधन काढण्यासाठी कन्याबळी देण्याची मागणी भोंदूबाबाने केली होती. विशेष म्हणजे कन्येचा बळी देण्यासाठी भोंदूबाबाने बापाकडेच पोटच्या १६ वर्षाच्या मुलीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

या भोंदूबाबाविरोधात बीडच्या अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादाराव घोशिर असं भोंदूबाबचं नाव आहे. तुमच्या मुलीचा बळी देवून तुम्हाला गुप्तधन मिळवून देतो, असं या भोंदूनं मुलीच्या वडिलांना सांगितलं होते.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील कोतन या गावातील दादाराव घोशिर या भोंदूबाबाने पुणे येथे असलेले गुप्तधन काढायचे आहे.त्यासाठी गावातील व्यक्तीला तुमची १६ वर्षाची मुलगी मला द्या, तिला सजवायचे आहे, नटवायचे आहे आणि तिचा बळी द्यायचा आहे. मग गुप्तधन मिळेल, त्यातील काही धन तुम्हाला देतो असे प्रलोभन दाखवले. तसेच ही गोष्ट कोणाला सांगितली,तर तुमच्या घरादाराला नष्ट करू, अशी धमकीही त्याने मुलीच्या वडिलांना दिली.

यानंतर या व्यक्तीने थेट पोलीस ठाणे गाठून संबंधित भोंदूबाबाविरोधात तक्रार दाखल केली. गुप्तधनासाठी कन्याबळी देण्याचा हा प्रकार बीडमध्ये उघड झाला आहे. अनुचित प्रकार घडू नये; म्हणून गावकऱ्यांनी बैठक घेऊन या संदर्भात पोलीस प्रशासनाला सूचना केली आहे. मात्र या घटनेमुळे कोतन गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Share This Article