स्वावलंबनातून देश समक्ष होईल! – मिलिंद देशपांडे
पिंपरी,दि.२७ (पीसीबी) – ‘स्वावलंबनातून देश सक्षम आणि विश्वगुरू होईल!’ असा आशावाद क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती विश्वस्त मिलिंद देशपांडे यांनी क्रांतितीर्थ, क्रांतिवीर चापेकर वाडा, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी व्यक्त केला. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळ्यात मिलिंद देशपांडे बोलत होते. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मदन ठोंबरे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, समिती सदस्य शाहीर आसराम कसबे, नितीन बारणे, अविनाश आगज्ञान, मुख्याध्यापिका वर्षा जाधव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – चिंचवड शाखेतील स्वयंसेवक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
मिलिंद देशपांडे पुढे म्हणाले की, ‘प्रत्येक गोष्ट सरकारी यंत्रणांनी करावी ही अपेक्षा योग्य नाही. उलटपक्षी आपल्या कामावर प्रामाणिक निष्ठा, स्वयंशिस्त, स्वच्छता, भ्रष्टाचारमुक्त व्यवहार असे आचरण प्रत्येक नागरिकाने ठेवल्यास देश जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था तर होईलच पण विश्वगुरू म्हणून भूमिका निभावेल!’ मदन ठोंबरे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. ॲड. सतीश गोरडे यांनी, ‘देश आता वेगाने प्रगतिपथावर वाटचाल करीत आहे. या वाटचालीत प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे!’ असे आवाहन केले. गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविकातून, ‘स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आता देशाचा अमृतकाल सुरू झाला आहे. २०४७ पर्यंत चालणार्या या अमृतकालातील वैभवशाली भारताचे साक्षीदार होण्याचे महद्भाग्य आताच्या विद्यार्थ्यांना लाभेल!’ असे विचार मांडले.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनी आणि सर्व उपस्थितांनी बँडच्या तालावर सामुदायिक राष्ट्रगीत आणि ध्वजगीत गायन करून ध्वजवंदन केले; तसेच राष्ट्रभक्तीपर जयघोष केला.
अतुल आडे, विनोद डोरले, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सुधाकर हांडे यांनी सूत्रसंचालन केले. राहुल बनगोंडे यांनी आभार मानले.