100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण

0
253

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत अजित पवार युतीत सामील झाले. अशातच आता अजित पवार यांना युती सरकारमध्ये सामील होऊन 100 दिवस पूर्ण झाले. या निमित्त महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून अजित पवार यांनी एक पत्र लिहिलं. या पत्रावर राष्ट्रवादीकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. नऊ मुद्दे मांडत राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. 100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण ठेवला म्हणत राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत अजित पवार यांच्यावर घणाघात करण्यात आलाय.

9 मुद्द्यांतून राष्ट्रवादीकडून अजित पवारांवर निशाणा
100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण…
100 दिवस छत्रपती -फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देण्याचे…
100 दिवस मायबाप शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचे…
100 दिवस वारकऱ्यांवर, मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करणाऱ्या नतद्रष्ट्यांसोबतचे …. १०० दिवस रुग्णालयांतील मृत्यूकांडास जबाबदार असंवेदशनील सरकारसोबतचे….
100 दिवस महाराष्ट्राचे हक्काचे रोजगार, प्रकल्प हिरावून घेणाऱ्या महाराष्ट्रविरोधकांसोबतचे
100 दिवस माताभगिनींवर अन्याय करणाऱ्या वृत्तीसोबत राज्यकारभार करण्याचे…
100 दिवस मराठा, ओबीसी, धनगर, लिंगायत, समाजाचे आरक्षण रखडवणाऱ्या आरक्षणविरोधकांसोबतचे…
100 दिवस मराठी अस्मितेची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांसोबतचे…
100 दिवसांचे कर्तुत्व सांगावं लागणं यातच तुमच्या चुकीच्या निर्णयाबद्दलची मनातील खंत लख्ख दिसून येत आहे…
पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जगणारा कधीच दिल्लीच्या तख्तापुढे आपला महाराष्ट्र स्वाभिमान गहाण ठेवत नाही. जो तुम्ही गेले 100 दिवस गहाण ठेवलात… कितीही मोठं संकट आलं तरी, विचारांच्या तत्वांशी एकनिष्ठ राहून कुणापुढे न झुकता महाराष्ट्राच्या हिताचा ध्यास अहोरात्र बाळगण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांमध्येच आहे.

अजित पवार यांचं पत्र काय?
अजित पवार गट महायुती सरकारमध्ये सामील होऊन 100 दिवस पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला एक पत्र लिहिलं. महाराष्ट्रातील माझ्या बंधू आणि भगिनींनो… असं म्हणत अजित पवार यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष असा स्वत: चा उल्लेख केल. या पत्रातून अजित पवार यांनी युती सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला. तसंच या पत्रात दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचाही दाखला देण्यात आला आहे. वंदनीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी समाजकारण करताना मांडलेलं ‘बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व’ हे सूत्र माझी प्रेरणा आहे, असं म्हणण्यात आलं आहे.