मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 100 दिवस-विभाग निहाय कृती आराखड्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागांना महत्त्वाचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम व्यापक प्रमाणात यशस्वी ठरला असून याअंतर्गत आतापर्यंत 411 कामांची कार्यवाही पूर्ण झाली आहे. तर कार्यवाही सुरू असलेली 372 कामे असून ती लवकरच पूर्ण होणार आहे. अशा पद्धतीने 100 दिवस कार्यक्रमांतर्गत 85% कामे पूर्ण करण्याची कौतुकास्पद कामगिरी विविध विभागांनी केली आहे. 1 मेपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत, प्रत्येक विभागाने आपल्या संकेतस्थळावर 100 दिवस कार्यक्रमाची माहिती उपलब्ध करुन द्यावी, तसेच काही कार्यवाही अपूर्ण राहिली तर त्याची कारणेही उपलब्ध करुन द्यावी, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
बैठकीमध्ये एकूण 26 विभागांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. या विभागांच्या 938 मुद्द्यांपैकी 411 मुद्द्यांवर (44%) काम पूर्ण झाले आहे. तसेच, 372 मुद्दे (40%) अंतिम टप्प्यात असून निश्चित वेळेत पूर्ण होतील. मात्र, 155 मुद्दे (16%) अद्याप पूर्ण झाले नाहीत. या कामांच्या पूर्ततेबाबत असलेल्या समस्यांची माहिती संबंधित विभागांनी दिली. त्यासाठी त्यांना 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे. सर्व विभागांनी कामे पूर्ण करुन 1 मे रोजी त्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना पुढील निर्देश दिले :
✅ सर्व विभागांनी लोकहिताच्या कामांना गती द्यावी आणि गुणवत्तापूर्ण कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावी.
✅ लोकप्रतिनिधींच्या पत्रांवर त्वरित कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक विभागाने स्वतंत्र यंत्रणा उभारावी.
✅ उद्दिष्टपूर्तीसाठी येणाऱ्या तांत्रिक, प्रशासकीय किंवा अन्य अडचणी तत्काळ सोडवाव्यात.
✅ उपलब्ध निधीचा सुयोग्य वापर करावा आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवाव्यात.
बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संबंधित विभागांचे मंत्री, तसेच संबंधित अप्पर मुख्य सचिव व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.