पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ॲम्ब्युलन्समधून गांजा विक्री करणाऱ्या आरोपींना गजाआड केले आहे. आरोपींकडून १ कोटी ३१ लाखांचा तब्बल ९६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोन ॲम्ब्युलन्स, चार मोबाईल आणि एक चार चाकी जप्त करण्यात आल्या आहेत. कृष्णा मारुती शिंदे, अक्षय बारकू मोरे, हनुमंत भाऊसाहेब कदम, देवी प्रसाद उर्फ देवा सिताराम डूकळे, सनीदेवल सिद्धार्थ शर्मा, सनीदेवल भगवानदास भारती आणि सौरव निर्मल यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी हे पिंपरी-चिंचवडच्या चिखली परिसरात ॲम्ब्युलन्समधून सौरव निर्मल यास गांजा विक्री करणार होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरामध्ये चोरुन व लपुनछपुन होणारी अंमली पदार्थाची विक्री, साठवणुक व वाहतुकीस पुर्णपणे प्रतिबंध व्हावा या करीता पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार दि.१२ जानेवारी २०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे व रणधीर माने यांना मिळालेल्या बातमीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने रावेत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये म्हस्के वस्ती येथे बी.आर.टी. रोडच्या कडेला कृष्णा मारुती शिंदे (वय २७ वर्षे, रा. शिंदेवस्ती, शितपुर, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अक्षय बारकु मोरे (वय २९ वर्षे, रा. कान्होबा वस्ती, पाटेगाव, ता. कर्जत जि. अहमदनगर), हनुमंत भाऊसाहेब कदम (वय ३५ वर्षे, रा. कुसडगाव, एस.आर.पी.एफ. सेंटर जवळ, ता. जामखेड, जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ३० लाख ५५ हजार ७०० रूपये किंमातीचा माल पकडण्यात आला. त्यामध्ये २५ लाख ६९ हजार १००रुपये किंमतीचा २५ किलो ६९१ ग्रॅम गांजा, एक सफेद रंगाची शेवरोलेट क्रुझ कंपनीची कार नं. एमएच १४ सी.डब्ल्यु ०००७ ही कार, ०४ मोबाईल व १,६००/- रुपये रोख रक्कम असा माल जप्त केला. त्यांनी हा गांजा देवी प्रसाद उर्फ देवा सिताराम डुकळे (वय ३२ वर्षे रा. उंडेगाव ता. परांडा, जि. धाराशिव) यांच्याकडुन आणला होता. हा गांजा ते सौरव निर्मल (रा. रुपीनगर, चिखली, पुणे पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) याला विकणार असल्याचे सांगितल्याने त्यांच्या विरुध्द रावेत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरली. या दाखल गुन्ह्याच्या तपासात पाहिजे असलेला आरोपी देवी प्रसाद उर्फ देवा सिताराम डुकळे याला तांत्रिक विश्लेषणावरुन उंडेगाव धाराशिव येथुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे ५० लाख २० हजारांचा ५० किलो २०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तसेच हा गांजा सौरव निर्मल (रा. रुपीनगर, चिखली, पुणे) याला विकण्यासाठी आणल्याने व आरोपी ॲम्ब्युलन्समधुन गांजा वाहतुक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेवुन त्याच्याकडे असलेल्या दोन ॲम्ब्युलन्स जप्त करण्यात आल्या.
तसेच दि.१३ जानेवारी २०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस अंमलदार विजय दौंडकर व प्रसाद कलाटे यांना मिळालेल्या बातमीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने म्हाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे नाशिक हायवे रोड लगत, कुरुळी स्माशानभुमी ते अमर कांबळे यांची कात्रज दुध डेअरीकडे जाणा-या इंद्रायणी पार्क समोरील सर्व्हिस रोडवर कुरुळी ता. खेड जि.पुणे येथे इसम नामे सन्नीदेवल सिध्दनाथ शर्मा (वय २१ वर्षे रा. दिगंबर मोरे) यांच्या रुममध्ये ॲपेक्स गोडावुन समोर पुणे नाशिक हायवेलगत कुरुळी फाटा, कुरुळी ता. खेड जि.पुणे मुळगाव सराईगाढ ब्लॉक नगव रायपुर जि. सोनभद्र राज्य उत्तरप्रदेश व सन्नीदेवल भगवानदास भारती (वय २३ वर्षे रा. दिगंबर मोरे) याच्या रुममध्ये ॲपेक्स गोडावुन समोर पुणे नाशिक हायवेलगत कुरुळी फाटा, कुरुळी ता. खेड जि. पुणे मुळगाव सराईगाढ ब्लॉक नगव रायपुर जि. सोनभद्र राज्य उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडून एकुण २० लाख ७९ हजार ६०० रुपये किंमतीचा माल त्यामध्ये २० किलो १९६ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व दोन मोबाईलसह जप्त केला आहे. त्यांनी सदरचा गांजा हा उत्तरप्रदेश येथुन राजेश कुमार रा. घोरावल जिल्हा सोनभद्र राज्य उत्तरप्रदेश यांच्याकडुन आणला होता. म्हणुन त्यांच्या विरुध्द म्हाळुंगे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा प्रकारे एकाच दिवशी अंमली पदार्थ विरोधी पथकाने ०२ कारवाईमध्ये एकुण १ कोटी ३१ लाख ५५ हजार ३०० रुपये किंमतीचा एकुण ९६ किलो ०८७ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, एक शेवरोलेट क्रुझ कंपनीची कार व दोन ॲम्ब्युलन्स जप्त करुन त्यातील माल देणारे व माल घेणारे आरोपींना ताब्यात घेवुन त्यांची साखळी नष्ट करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-१ बाळासाहेब कोपनर, यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस उप-निरीक्षक राजन महाडीक व पोलीस अंमलदार सहायक पोलीस फौजदार बाळासाहेब सुर्यवंशी, जिलानी मोमीन, प्रदिप शेलार, पोलीस हवालदार राजेंद्र बांबळे, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, मनोज राठोड, संतोष भालेराव, अनिता यादव, पोलीस नाईक विजय दौंडकर, प्रसाद कलाटे, अजित कुटे, पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड, रणधीर माने, मितेश यादव, सदानंद रुद्राक्षे, अशोक गारगोटे, कपिलेश इगवे व पाडुरंग फुंदे यांनी केली आहे.