ॲड. मोरेश्वर शेडगे यांची भाजप प्रदेश कार्यकारणीवर नियुक्ती

0
187

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – गेले अनेक वर्षे पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीसाठी प्रामाणिकपणे काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे ॲड. मोरेश्वर शेडगे यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीवर आज नियुक्ती करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोरेश्वर शेडगे यांना प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्त करण्यात आल्याचे पत्र आज सुपूर्द केले.

ॲड. शेडगे हे गेली अनेक वर्षे पिंपरी चिंचवड शहरात पक्ष हितासाठी व पक्षाच्या बांधणीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. अनेकदा त्यांना संधी असतानाही केवळ पक्ष हितासाठी म्हणून त्यांनी अनेक व्यक्तिगत त्याग केले आहेत. पक्षासाठी म्हणून अहोरात्र प्रयत्नशील असणारे मोरेश्वर शेडगे यांना प्रदेश कार्यकारणीवर घेऊन भारतीय जनता पार्टीने काहीअंशी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

अल्प परिचय –
भारतीय जनता पक्षाच्या स्थापने पासून मोरेश्वर शेडगे यांचे वडील ज्ञानेश्वर शेडगे व चुलते शिवाजी शेडगे हे पक्षसंघटनेचे कार्य करत आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. महाविद्यालयीन जीवनात आखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचे सक्रिय कार्य केले आहे. शेडगे हे २००२ पासून पक्षाचे पूर्णवेळ सक्रिय काम करित आहेत. २००२ मधे भाजप युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष, २००३ मधे भाजप युवा मोर्चा मंडल अध्यक्ष, २००६ मधे भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड संघठन सरचिटणीस, २००९ मधे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष, २०११ भाजयुमो प्रदेश सचिव, २०१३ मधे भाजयुमो पिंपरी चिंचवड जिल्हाध्यक्ष व २०२० मधे भाजपा पिं.चि. जिल्हा महामंत्री या क्रमाने पक्षाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचार विरोधात त्यांनी आंदोलने केली.

२०१४ मधे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधना नंतर विधानसभा निवडणुंका आधी आ.पंकजाताई मुंडे यांनी काढलेल्या ‘पुन्हा एकदा संघर्ष यात्रेत ॲड. मोरेश्वर शेडगे पुर्णवेळ सहभागी होते व त्यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती. २०१९ मधे तात्कलीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत पुर्णवेळ सहभाग घेऊन अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. महानगरपालिका निवडणूकीत १००% हमखास निवडूण येणार याची खात्री असतांना देखिल पक्षाची मिळालेली उमेदवारी स्थानिक नेतृत्वाने नाकारली असतांना देखिल प्रदेश नेतृत्वाने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲड.मोरेश्वर शेडगे हे पक्षाचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते असल्याने त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची गांभीर्याने दखल घेत त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक केले.