९०% कर्मचारी भ्रष्ट! शिंदे गटातील आमदाराच्या वक्तव्यामुळे गोंधळ; पुतळे जाळून केला निषेध

0
263

चंद्रपूर, दि. २१ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ९० टक्के कर्मचारी भ्रष्ट असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली असून राजुरा तहसील कार्यालय परिसरात संपकरी कर्मचाऱ्यानी आमदार गायकवाड यांच्या पुतळ्याचे दहन करून शिंदे शिवसेना व आमदार गायकवाड यांचा जाहीर निषेध केला तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

राजुरा तालुक्यातील सर्व विभागातील कर्मचारी १४ मार्चपासून संपावर गेले आहेत. संपाला एक आठवडा झाला आहे. मागण्या पूर्ण होत नाही तोवर संप सुरू राहील असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. अशातच राजुरा तहसील परिसरात कर्मचाऱ्यांनी ठाण मांडले आहे. या आंदोलन सर्वच विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालय ओस पडलेले आहेत सर्वसामान्यांची कामे ठप्प झालेली आहेत. जुनी पेन्शन तथा इतर मागण्यांकरिता पुकारलेला हा लढा मागण्या पूर्ण होईपर्यंत असाच सुरू राहील असा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे.

कर्मचाऱ्यांविरुद्ध अभद्र बोलणाऱ्या आमदारांना धडा शिकवण्यात येईल असा निर्धार कर्मचारी संघटनांनी घेतलेला आहे. यावेळी आमदार गायकवाड व शिंदे शिवसेना विरोधात तीव्र घोषणा देत आमदाराच्या पुतळ्याचे दहन केले. या राज्यव्यापी संपामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे , जुन्या पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष राजू डाहुले, पुरोगामी शिक्षक समितीचे अध्यक्ष संदिप कोंडेकर, प्रदिप पायघन, किरण लांडे ,हंसराज शेंडे , आरोग्य विभाग संघटनेचे पि आए कामडी, सुरेश खाडे , महसूल विभागाचे कु. रंजीता कोहपरे, वनविभागाचे संतोष कुकडे, अमोल बदखल, पंकज गावडे, अविनाश पिंपळशेंडे, सुधिर झाडे , दिपक भोपळे, श्रीकांत भोयर यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.