८५ वर्षांचा प्रवास अपराजेय शरद पवार! पक्ष फुटला… चिन्ह गेलं… पण पवार थांबले नाहीत

0
4

दि.१२ (पीसीबी) आपल्या देशात राजकीय नेते फार थोड्याच लोकांचे आदर्श ठरतात. त्यामागे कारणेही तशीच गंभीर आहेत. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे एक असं नाव आहे की ज्यांच्याबद्दल तरुणाईला आजही कुतूहल आहे. अनेक तरुण त्यांना स्वतःचा आदर्श मानतात. आज शरद पवारांचा वाढदिवस. त्यांनी वयाच्या ८५व्या वर्षात पदार्पण केलं.

शरद पवारांना आदर्श मानावा, असे अनेक गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहेत. आजची तरुण पिढी छोट्या पराभवानंतर लगेच निराश होते, हार मानते. पण शरद पवारांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत कधीही त्यांनी सार्वजनिक मंचावर संयम सुटलेला दिसला नाही. पराभव स्वीकारायचा, पण त्यातून उठून पुन्हा लढायचं हा त्यांचा ठाम स्वभाव.

त्यांच्यावर राज्यकारभारात तडजोडी, फोडाफोडीचे आरोप झाले. काही जण म्हणतील की हे आदर्श कसे ठरू शकते. पण राजकारणात सत्ता मिळवणे, संघटना वाढवणे हेच उद्दिष्ट असतं आणि त्या दृष्टीने त्यांनी केलेले निर्णय नेहमीच वास्तववादी होते. पवारांचा सर्वात मोठा गुण म्हणजे न हार मानणारी वृत्ती आणि सतत काम करत राहण्याची सवय.

दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वतः उभा केलेला पक्ष, स्वतःच्याच घरातून फोडला गेला. अजित पवारांनी पक्षासह निवडणूक चिन्हही मिळवलं. हा कोणालाही हादरवणारा धक्का होता. पण शरद पवार तक्रार करत बसले नाहीत. दुसऱ्याच दिवशी ते पुन्हा कामाला लागले. त्यांनी कराडच्या प्रितीसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांना वंदन केलं आणि नव्याने संघटन उभी करण्यासाठी पुन्हा महाराष्ट्रभर दौरे सुरू केले.

८३-८४ वर्षांच्या वयात त्यांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला. लोकसभेत त्यांना चांगले यश मिळाले, विधानसभेत अपेक्षेप्रमाणे फायदा झाला नाही. पण तरीही पवारांनी मागे हटणे निवडले नाही. ते आजही जनतेत फिरतात, सभा घेतात, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात.त्यांच्या सकारात्मक ऊर्जेचं आणखी एक उदाहरण म्हणजे त्यांनी कॅन्सरसारख्या आजारावरही मात केली. मानसिक ताकद, शिस्तबद्ध दिनचर्या आणि कामाप्रती निष्ठा यामुळेच ते आजही सक्रिय आहेत.आजच्या तरुणांसाठी शरद पवारांकडून शिकण्यासारखे धडे अनेक आहेत अपयशाने खचायचं नाही, परिस्थिती काहीही असली तरी संयम ठेवायचा, आणि महत्त्वाचं म्हणजे ध्येयापासून कधीच दूर जायचं नाही.