७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयातसंघाने केले होते ‘रेड कार्पेट’ स्वागत

0
83

नागपूर, दि. 10 (पीसीबी) : नागपूरशी सुरुवातीपासूनच नाळ जुळलेल्या टाटा समूहाचे तत्कालिन अध्यक्ष रतन टाटा यांचा साधेपणा नागपूरकरांनीदेखील अनुभवला होता. ७९ व्या वाढदिवशी सेलिब्रेशन करण्याऐवजी टाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पोहोचले होते व तेथे त्यांनी विदर्भातील विविध सेवाकार्यांची माहिती जाणून घेतली होती. विशेष म्हणजे, संघानेदेखील परंपरेला छेद देत टाटा यांचे अक्षरश: रेड कार्पेट स्वागत करत त्यांना नागपुरी पद्धतीने आदरसत्कार केला होता.
२८ डिसेंबर २०१८ रोजी बुधवारी रतन टाटा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन सुमारे २० मिनिटे चर्चा केली. सायरस मिस्त्री यांना बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर टाटा समूह काहीशा संकटातून जात होता. त्या कालावधीत टाटा यांनी नागपूरला भेट दिली होती. त्यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी त्यांनी बंदद्वार चर्चा केली होती.

संघाने दिला होता परंपरेला छेद
साधारणत: संघ मुख्यालयात देशातील मोठ्या असामींची वर्दळ असतेच. मात्र कुणालाही संघातर्फे विशेष वागणूक दिली जात नाही. मात्र रतन टाटांसाठी मात्र संघाने अक्षरश: ‘रेड कार्पेट’च अंथरले होते. विमानतळावरील त्यांच्या आगमनापासून अखेरपर्यंत संघ पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते. नागपूर विमानतळावर देखील त्यांचे स्वागत करण्यात आले होते.

नागपुरकरांना बसला होता आश्चर्याचा धक्का
त्या दिवशी टाटा अचानक नागपुरात दाखल झाले व ते विमानतळाच्या बाहेर निघाल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यांनी रेशीमबाग येथे जाऊन आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांनी संघाच्या विविध प्रकल्पांविषयी जाणून घेतले होते.संघाच्या समाजकार्यात सहभागी होण्याची इच्छा त्यांनी यावेळी प्रदर्शित केली होती. या भेटीनंतरच चंद्रपूर जिल्ह्यातील अत्याधुनिक बांबू प्रशिक्षण केंद्राबाबत टाटा ट्रस्टने सामंजस्य करार केला होता.

२०१९ मध्ये अखेरची नागपूर भेट

१८ एप्रिल २०१९ रोजीदेखील रतन टाटा नागपुरात आले होते व त्यांनी संघ मुख्यालयात सरसंघचालकांशी चर्चा केली होती. त्याच वर्षीच्या संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमासाठी संघाने टाटा यांना निमंत्रण दिले होते. मात्र कार्यव्यस्ततेमुळे त्यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणे जमणार नसल्याचे कळविले होते.

गडकरींची टाटांना आदरांजली, देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना

नागपूर : देशाला उद्योगक्षेत्रात वेगळ्या उंचीवर नेणारे रतन टाटा यांच्या निधनानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त करत आदरांजली अर्पण केली आहे. देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची त्यांनी भावना व्यक्त केली.
देशाचे महान सुपुत्र रतन टाटा यांच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. तीन दशकांहून अधिक काळ रतन टाटाजींसोबत अतिशय घनिष्ट कौटुंबिक संबंध होते. त्यांच्यासारख्या महान व्यक्तीचा साधेपणा, त्यांचा उत्स्फूर्तपणा, त्यांच्यापेक्षा लहान असलेल्यांचाही ते करत असलेला आदर हे सगळे गुण मी अगदी जवळून पाहिले आणि अनुभवले होते. त्यांच्याकडून मला आयुष्यात खूप काही शिकायला मिळाले. देशातील सर्वात मोठे उद्योगपती असल्याने देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात आणि रोजगार निर्मितीमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. महान देशभक्त असण्यासोबतच ते तत्त्वांचे पालन करणारेही होते. ते जितके मोठे उद्योगपती होते तितकेच ते एक संवेदनशील समाजसेवक होते. त्यांच्या निधनाने भारताने एक आदर्श आणि कष्टाळू व्यक्तिमत्त्व गमावले आहे. हा देश रतन टाटा यांना कधीही विसरू शकत नाही. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो, असे गडकरी यांनी प्रतिपादन केले.

मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला
देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली

ज्येष्ठ उद्योगपती श्रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.

रतन टाटा एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण, त्यापलिकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते. शिक्षण, ग्रामोन्नती आणि कुपोषण, आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतिशय उल्लेखनीय असेच आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे. समाजातून कमावलेले समाजालाच परत केले पाहिजे, या श्रद्धेनेच ते कायम जगले. फार पूर्वी टाटा ट्रस्टने कँसर रुग्णांसाठी सुरु केलेल्या सुविधा असोत, किंवा अलिकडे मुंबईत सुरु केलेले प्राण्यांचे रुग्णालय हे त्यांच्यातील करुणेचा परिचय देते. रतन टाटा यांच्यासोबत अनेकदा भेटीची संधी मला प्राप्त झाली. मुख्यमंत्री असताना राज्यात व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनची निर्मिती आम्ही केली, त्यावेळी बहुतेक बैठकांना ते येत असत. अतिशय सक्रिय राहून त्यांनी राज्य सरकारसोबत काम केले होते. त्याच काळात राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’चे आयोजन केले, तेव्हाही ते सातत्याने सोबत होते. नागपुरात आम्ही नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटची स्थापना केली, तेव्हा सातत्याने त्यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय पाठिंबा प्राप्त झाला. त्यांचे जाणे, ही महाराष्ट्राची, देशाची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे