७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक

0
4

पिंपरी, दि. २१ :- उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात सायबर गुन्हेगारांनी सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘डिजिटल अटक’ची भीती दाखवून आरोपींनी ही रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

चिंचवड येथील शिवाजी पार्क परिसरात राहणारे अशोक कृष्णा सराफ (वय ७७) यांना काही अज्ञात व्यक्तींनी फोन केला. फोनवरून आरोपींनी स्वतःची ओळख प्रथम टेलिफोन विभागाचे अधिकारी, नंतर सर्व्हिलन्स अधिकारी आणि अखेरीस सीबीआय अधिकारी अशी करून दिली. त्यांनी सराफ यांना सांगितले की, त्यांच्या नावावरील कॅनरा बँकेच्या खात्याचा वापर नरेश गोयल यांच्यावरील ईडी कारवाईतील मनी लाँड्रिंग प्रकरणात झाला आहे.
या प्रकरणात तात्काळ अटक होऊ शकते, अशी भीती दाखवून आरोपींनी सराफ यांचे मानसिक खच्चीकरण केले. तसेच बँक खात्यातील आणि म्युच्युअल फंडातील रकमेची ‘लिगॅलिटी तपासणी’ करायची असल्याचे सांगत, सर्व पैसे ठराविक बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रक्कम परत दिली जाईल, असे आश्वासनही देण्यात आले.