६३ कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी टॉपवर्थ स्टील्सच्या संचालकाला ईडीकडून अटक…!

0
168

मुंबई,दि.३१(पीसीबी) – सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मेसर्स टॉपवर्थ स्टील्स ॲण्ड पॉवर प्रायव्हेट लिमिटेडचे प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक अभय नरेंद्र लोढा यांना बुधवारी अटक केली. आयडीबीआय बँकेचे ६३ कोटी रुपयांचे कर्ज फसवणुकीप्रकरणी ईडीने ही कारवाई केली. लोढा यांना विशेष न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना ८ सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी ईडीने मुंबई, पुण्यासह देशभरात १२ ठिकाणी छापे टाकल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मुंबई शाखेनने मेसर्स टॉपवर्थ स्टील्स आणि पॉवर प्रायव्हेट लिमिटेडविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने याप्रकरणी आर्थिक गैरव्यवहाराबाबत तपासाला सुरूवात केली होती. त्याप्रकरणी अभय नरेंद्र लोढा आणि इतर संशयीतांशी संबधित मुंबई, पुणे, नवी दिल्ली, नागपूर आणि दुर्ग येथील १२ ठिकाणी झडती घेण्यात आली. परदेशात आणि भारतातील विविध स्थावर मालमत्ता आणि कंपन्यांच्या मालकीचे तपशील (आतापर्यंत घोषित केलेले नाहीत) शोध मोहिमेदरम्यान उघडकीस आले. विविध देशांचे सुमारे सात लाख रुपये किमतीपेक्षा अधिक परकीय चलन, विविध संशयीत कागदपत्रे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. अभय लोढा यांच्या नियंत्रणाखालील बनावट कंपन्यांची माहिती असलेला तपशीलही जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान आरोपींनी २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीत लेटर ऑफ क्रेडिट/ट्रेड क्रेडिट बँक गॅरंटी या कर्ज सुविधेचा वापर करून आरोपींनी फसणूक केल्यामुळे आयडीबीआय बँकेचे ६३ कोटी १० लाख रुपयांचे नुकसान झाले होते. अभय नरेंद्र लोढा यांच्या नियंत्रणाखालील टॉपवर्थ ग्रुप ऑफ कंपन्यांनी टॉपवर्थ ग्रुप आणि त्याच्याशी संबंधित संस्थांद्वारे तीन हजार कोटी रुपयांचे संशयीत व्यवहार केल्याचे ईडीने सांगितले. याबाबत ईडी अधिक तपास करीत आहे.