५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी वेळेत भरला मालमत्ता कर

0
2

*पिंपरी, दि. ११ – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर भरण्याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शहरात सुमारे ७ लाख ३२ हजार ३०२ मिळकतींची नोंद असून, त्यापैकी ५ लाख २६ हजार २२६ मालमत्ताधारकांनी आतापर्यंत मालमत्ता कराचा भरणा केला आहे. तर अद्याप २ लाख ६ हजार ७६ मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही, अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली. ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापही मालमत्ता कराचा भरणा केला नाही त्यांनी चालू वर्षाचा मालमत्ता कर थकबाकी तातडीने भरावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत पहिल्या व दुसऱ्या तिमाहीत मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देण्यात आल्या होत्या. या सवलतींचा लाभ घेत अनेक नागरिकांनी वेळेत कर भरला असून, यामुळे कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. महापालिकेच्या या नागरिककेंद्रित धोरणाला करदात्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

याशिवाय महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन, रोख, धनादेश तसेच ई-डीसीएस या विविध सुलभ माध्यमांचा लाभ घेत मालमत्ताधारक मोठ्या प्रमाणात कर भरणा करत आहेत. विशेषतः ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, यामुळे प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक झाली आहे. तसेच अद्याप ज्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी तो भरून विलंब दंड तसेच कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत नियमानुसार करण्यात येणारी कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
…….
ऑनलाइन कर भरण्यास पसंती

• मालमत्ता कर ऑनलाइन भरणाऱ्या करदात्यांची संख्या ४ लाख ३० हजार २७९ आहे.

• रोख स्वरूपात ५६ हजार ४५० मालमत्ताधारकांनी कर भरला आहे.

• १२ हजार ५११ जणांनी धनादेशाद्वारे कर भरणा केला आहे.

• बीबीपीएस सुविधेचा लाभ घेऊन २६ हजार ८८१ मालमत्ताधारकांनी कर भरला आहे.

• ई-डीसीएस (EDCS) सुविधेचा लाभ घेऊन १०५ जणांनी मालमत्ता कर भरला आहे.

ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही, त्यांनी तातडीने कर भरावा. महापालिकेने कर भरण्यासाठी सुलभ आणि विविध माध्यमे उपलब्ध करून दिली आहेत. वेळेत कर भरल्यास विलंब दंड तसेच जप्ती अथवा इतर कारवाई टाळता येईल. नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील १८ विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आली आहेत.
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका