५९ कोटींच्या घोटाळ्यावर आमदार अश्विनी जगताप बोलतात, मग भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे गप्प का ?

0
344

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – यांत्रिक साफसफाईचा ठेका देताना विशिष्ट ठेकेदाराला डोळ्या समोर ठेवून निविदा काढण्यात आल्याने तब्बल ५९ कोटींचे नुकसान होणार असल्याचे चिंचवड विधानसभेच्या भाजप आमदार श्रीमती अश्विनी जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या निदर्शनास आणून दिले. दुसरीकडे याच विषयावर भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनीसुध्दा आमदार जगताप यांच्यामागे ठामपणे उभे राहायचे सोडून चक्क गुळणी धरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आमदार अश्विनी जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “शहरातील रस्त्यांची यात्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध केल्यानंतर १० ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या निविदापूर्व बैठकीत निविदेत नव्याने अट समाविष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार स्वमालकीच्या दोन नग रोडस्वीपर असण्याच्या अनुभवाच्या अटीचा निविदेत नव्याने समावेश केला आहे. महापालिकेने यापूर्वीही या कामासाठी अनेकदा अशी निविदा प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये एकदाही वरील जाचक अट टाकण्यात आलेली नव्हती. परंतु, आता महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी आर्थिक हितसंबंध जोपासत विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून निविदेत जाचक अट टाकली आहे.
सुरूवातीला प्रसिद्ध केलेल्या निविदेत कोणतीही जाचक अट नव्हती. त्यावेळी तब्बल ३३ निविदा प्राप्त झाल्या होत्या. पण नंतर समाविष्ट केलेल्या जाचक अटीमुळे अनेक निविदाधारक बाद झाले आहेत. ते या निविदेत सहभागी होण्यापासून वंचित राहिले आहेत. परिणामी या निविदेत अधिकाऱ्यांच्या मर्जीतील केवळ चारच ठेकेदार पात्र झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या निविदेतून सात वर्षात महापालिकेचे तब्बल ५९ कोटी रुपये नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे मनमानी कारभार करून शहरातील सामान्य नागरिकांच्या कष्टाच्या पैशांची केली जाणारी उधळपट्टी रोखणे आवश्यक आहे. त्यामुळे ही निविदा रद्द करून नव्याने पारदर्शी व स्पर्धात्मक निविदा प्रसिद्ध करण्याचे आपण आदेश द्यावेत, अशी मागणी श्रीमती जगताप यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात स्वपक्षाच्या आमदार म्हणून श्रीमती जगताप यांच्या मागे आमदार महेश लांडगे यांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे होते. प्रत्यक्षात ते या विषयावर चकार शब्दही बोलत नाहीत. महापालिकेत भ्रष्टाचार मुक्तीसाठी आमदार श्रीमती जगताप यांनी पहिलेच पाऊल उचलले असताना भाजप शहराध्यक्षांनी त्यांचे स्वागत केले पाहिजे. तब्बल ५९ कोटींचे करदात्यांचे नुकसान होत असल्याचे श्रीमती जगताप यांनी प्रशासनाला पटवून दिले. त्यासाठी निविदा रद्द करण्याची मागणी जगताप यांनी केली आणि प्रसंगी आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे. कुठल्याही किरकोळ मुद्यावर आमदार महेश लांडगे हे तुटून पडतात, पण यांत्रिक साफसफाईच्या ठेकेदारीवर इतके गंभीर आरोप खुद्द भाजपचेच आमदार करत असताना आमदार लांडगे एक शब्द बोलत नसल्याने संशय बळावला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा एक बडा नेता आणि भाजपचा एक स्थानिक मोठा नेता या ठेकेदारीत भागीदार असल्याची चर्चा आता सुरू आहे. संशयाची सुई थेट आमदार लांडगे यांच्या दिशेने जात असल्याने ते काही बोलत नाहीत, असेही सांगण्यात आले.

भामा आसखेड जॅकवेल ३० कोटींचा भ्रष्टाचार –

भामा आसखेड धरणातील जॅकवेल च्या कामात १२१ कोटींची निविदा थेट १५१ कोटी रुपये म्हणजे ३० कोटी रुपयांनी जास्त आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेसने ही संशयास्पद निविदा रद्द करण्याची मागणी केली होती. आपल्या हयातीत आमदार जगताप यांना त्यात तथ्य आढळल्याने त्यांनीसुध्दा प्रशासनाला पत्र दिले होते आणि ३० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार हाणून पाडण्याची मागणी केली होती. त्या प्रकऱणातसुध्दा भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी भूमिका न घेता मौन बाळगले होते. आपले सहकारी जेष्ठ आमदार जगताप हे गंभीर स्वरुपाचे आरोप करत असताना आमदार लांडगे यांनीसुध्दा सहमती दर्शविणे अपेक्षित होते, प्रत्यक्षात लांडगे आजअखेर एक शब्दही बोलले नाहीत.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हाय व्हॅक्यूम सक्शन मशिन खरेदीचा प्रस्ताव होता. अशा प्रकारची एक मशिन फक्त ३ लाख रुपयांना उपलब्ध असताना २० मशिन तब्बल दामदुप्पट दराने म्हणजे ६ कोटी ८० लाखाला खरेदीचा घाट प्रशासनाने घातला होता. एकूण २० मशिन खरेदीसाठी बाजारभावाने अवघे ६० लाख रुपये लागत असताना प्रशासनाने त्या तब्बल १ कोटी ३६ लाखाला खरेदी केल्या. सरळ सरळ दामदुप्पट भ्रष्टाचार दिसत असताना भ्रष्टाचार निर्मुलनाचा डांगोरा पिटणारे आमदार महेश लांडगे यांनी तिथेही आळीमिळी गुपचिळी होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचाराच्या विरोधत रोखठोक बोलत असताना त्यांच्याच पक्षाचे एक आमदार आवाज उठवतात तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष असलेले आमदार महेश लांडगे तोंड फिरवून बसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकऱणांमागचे गूढ वाढत आहे.