५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

0
177

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – देशभर लोकसभा निवडणुकांचा माहौल असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार, २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. तर, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी असणार आहे.

महाराष्ट्रातील भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर , नारायण राणे , व्ही. मुरलीधरन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, शिवसेनेचे अनिल देसाई आणि काँग्रेसचे खासदार कुमार केतकर निवृत्त होणार आहेत. दोन एप्रिलला त्यांची मुदत संपणार आहे. देशातील 13 राज्यांतील एकूण 50 खासदार यादिवशी निवृत्त होत आहेत. तर दोन राज्यातील सहा खासदारांची मुदत तीन एप्रिलला त्यांची मुदत संपत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ राज्यांच्या ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जाहीर होणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल. १६ फेब्रुवारीला उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया होईल. तसंच, २० फेब्रुवारीपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घऊ शकतील. तर, २७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. तर, २७ तारखेलाच मतमोजणी होईल.

१३ राज्यातील जागांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. तर, उर्वरित दोन जागांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश ३, बिहार ६, छत्तीसगड १, गुजरात ४, हरयाणा १, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक ४, मध्य प्रदेश ५, महाराष्ट्र ६, तेलंगणा ३, उत्तर प्रदेश १०, उत्तराखड १, पश्चिम बंगाल ५, ओडिसा २, राजस्थान ३ अशा एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेली राज्यसभा हे स्थायी सभागृह असून, ते कधीही विसर्जित होत नाही. मात्र, या सभागृहाचे एक-तृतियांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. मूळ राज्यघटनेने राज्यसभा सदस्यांचा कालवधी निश्चित केलेला नाही. ती जबाबदारी संसदेकडे देण्यात आली. त्यानुसार संसदेने लोकप्रतिनिधी कायदा १९५१ पारित करीत राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत सहा वर्षे निश्चित केली आहे.
राज्यसभेला काऊन्सिल ऑफ स्टेट्स असंही म्हटलं जातं. यालाच वरिष्ठ हाऊस म्हणजे अप्पर हाऊसही संबोधलं जातं. राज्यसभेत जास्तीत जास्त २५० जागा असू शकतात तर, त्यापैकी १२ सदस्य राष्ट्रपतींकडून निवडले जातात. उर्वरित २३६ सदस्य देशातील सर्व राज्यांतून आणि २ सदस्य केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात.