पिंपरी, दि. १ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला कर्जाच्या खाईत लोटण्याचे पाप आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी करू नये. प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलेली 550 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची कार्यवाही त्वरीत रद्द करावी, अन्यथा या उधळपट्टी धोरणाविरुध्द व चुकीच्या निर्ण्याविरुध्द शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरून प्रशासनाचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे संघटक संजोग वाघेरे (पाटील) यांनी दिला आहे.
प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात पाटील म्हणतात, आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्ता नागरिकांना भुलथापा देऊन भारतीय जनता पक्षाने हस्तगत केली. त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात महानगरपालिकेत स्मार्ट सिटी, अर्बन स्ट्रीटपासून असंख्य मोठ्या प्रकल्पाच्या नावाखाली पिंपरी-चिंचवडकरांच्या तिजोरीची लूट करण्यात आली. महानगरपालिकेने मागील काळात राबविलेले अनेक प्रकल्प फसलेले आहेत. ते पुर्णत्वास गेलेले नाहीत. त्यात महानगरपालिका आयुक्त म्हणून आपण आर्थिक शिस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. आपण प्रचंड राजकीय दबावाखाली काम करत आहात.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, पर्यायाने पिंपरी चिंचवड शहरातील करदात्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहात. टीडीआर प्रकरणात आपण घेतलेले निर्णय वादाच्या भोव-यात सापडले. या प्रकल्प स्थगित करण्याची वेळ तुमच्यावर आली. चुकीचे निर्णय घेऊन या शहराला चुकीच्या दिशेने नेत आहात. महानगरपालिकेची आर्थिक बाजू भक्कम करण्याची जबाबदारी आयुक्त म्हणून आपल्यावर आहे. ती जबाबदारी आपण पार पाडत नसून कोणाच्या तरी हातचे बाहुले होऊन काम करत आहात. त्याचे चित्र आपल्या नव्याने कर्ज काढण्याच्या निर्णयावरून दिसत आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.
आशिया खंडातील श्रीमंत महापालिका ही ओळख पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची होती. आपल्या कार्यकाळाती उधळपट्टी धोरणामुळे ही ओळख पुसली जात आहे. महानगरपालिकेला कर्जाच्या खाईत लोटण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी नदी सुधार प्रकल्पासाठी महानगरपालिकेने २०० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती आहे. त्यानंततर आणखी ५५० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी आपण जाहिरात प्रसिध्द केली आहे. रुग्णालय व रस्ते सुशोभिकरणाच्या कामासाठी आपण हे कर्ज घेत असल्याचे समजत आहे. आर्थिक नियोजन न करताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कर्जाच्या खाईत लोटण्याचे काम सुरू आहे. हे पिंपरी चिंचवडकर या नात्याने आम्ही कदापि होऊ देणार नाही. प्रशासकीय राजवटीत घेण्यात आलेला हा चुकीचा निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा. अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही या निर्णयाविरुध्द आपणास आव्हान देवू. रस्त्यावर उतरून आपल्या गैरकारभाराचा, चुकीच्या निर्णयाचा बुरखा फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. असे संजोग वाघेरे यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.