‘३ हजार द्या आणि…’, पुणे विद्यापीठात लाचखोरीचं धक्कादायक प्रकरण समोर

0
386

पुणे, दि. १ (पीसीबी) – महाराष्ट्रातील विद्येचं माहेरघर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लाचखोरीचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्याकडून तीन हजारांची लाच घेण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विद्यार्थी संघटनांनी थेट ऑफिसमध्ये जात आरोपी कर्मचाऱ्याच्या कृत्याचा भांडाफोड केला असून परीक्षा विभाग आणि विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळं आता आरोपी कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, विद्यापीठातील एक विद्यार्थी मार्कशीट घेण्यासाठी परिक्षा विभागात आला होता. त्यावेळी त्याला संबंधित कर्मचाऱ्याने तीन हजार रुपयांची लाच मागितली. पुढील शिक्षणासाठी मार्कशीट गरजेची असल्याने संबंधित विद्यार्थ्याने पैसे दिले. परंतु या घटनेची माहिती विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिली. त्यानंतर विद्यापीठातील विविध विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने परिक्षा विभागात धाव घेत आरोपी कर्मचाऱ्याला लाचखोरीबद्दलचा जाब विचारला. त्यावर ‘पैसे मी घेतली नाही, मला विद्यार्थ्यानेच दिले आहे’, असं उत्तर आरोपी कर्मचाऱ्याने दिलं. परंतु विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर कर्मचाऱ्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रारीची सत्यता आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. आम्ही चौकशी सुरू केली असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचं विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी म्हटलं आहे. विद्यापीठातील या धक्कादायक घटनेमुळं राज्याची शैक्षणिक राजधानीत खळबळ उडाली आहे. याशिवाय विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते आणि आरोपी कर्मचारी यांच्यातील संवादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.