पिंपरी, दि. २६ दुथडी भरून वेगाने वाहणारी इंद्रायणी नदी…नदीमध्ये चहू बाजूंनी वेढलेल्या भू-भागामध्ये अडकून पडलेल्या ३ गायींचा हंबरडा…अशा परिस्थितीत त्या गायींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तब्बल ३ तास चाललेले बचावकार्य…अंगावर शहारा आणि प्राणीमात्रांबद्दल ह्रदयात साठलेला कारुण्यभाव…संपुर्ण प्रकार डोळ्याची पापणी न लवता पाहणारे परिसरातील नागरिक…आणि आपत्कालीन यंत्रणेने अथक परिश्रमाने केलेली गायींची सुखरूप सुटका…हा सर्व प्रकार आज याची देही याची डोळा पाहणाऱ्या नागरिकांनी अनुभवला.
चऱ्होली बुद्रुक येथील इंद्रायणी धाम स्मशानभूमीच्या किनाऱ्याच्या विरूद्ध बाजूला असलेल्या नदीपात्रातील बेटावर गेल्या २ दिवसांपासून ३ गायी अडकून पडल्या होत्या. अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीची पाण्याची पातळी वाढत गेल्याने गायींच्या सुटकेबाबत सर्वजण चिंतीत होते. अशातच महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेला याबाबत माहिती मिळाली. शहरात पूरनियंत्रणासाठी विविध पथके काल दिवसभर विविध ठिकाणी मदत आणि बचावकार्यासाठी अहोरात्र काम करत होती. शहरातील आपत्कालीन परिस्थिती पाहता महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाशी संपर्क साधून त्यांना शहरात पाचारण केले. शहरातील विविध ठिकाणी या दलाच्या तुकडीने मदतकार्य करत बचावकार्यात महत्वाची भूमिका बजावली. आज चऱ्होली येथील नदीपात्रातील बेटावर अडकलेल्या गायींची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने मोहीम हाती घेतली. महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस दल, आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिक यांनी संयुक्तपणे बचावकार्य सुरू केले. सुमारे तीन तास चाललेल्या या बचावकार्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्याधुनिक सुसज्ज उपकरणांसह ३ बोटी आणि दोरखंडाच्या सहाय्याने गायींना सुखरूप नदीकाठी आणले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अग्निशमन दलाचे दोन वाहने, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसदा दलाची ३ वाहने घटनास्थळी तैनात करण्यात आली होती.
बचावकार्यामध्ये असिस्टंट कमांडंट निखिल मुधोळकर यांच्या अधिपत्याखाली आणि निरीक्षक हनुमंत नांबा यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआरएफचे २५ जवान, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखालील १० पोलीस कर्मचारी, उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब वैद्य यांच्या अधिपत्याखाली मोशी अग्निशमन केंद्राचे ९ जवान व तळवडे अग्निशमन केंद्रांचे १४ जवानांनी संयुक्तपणे ही मोहीम राबविली. या संपुर्ण मोहीमेत लाईफ प्रोटेक्शन अँड कंजर्वेशन ट्रस्ट फाउंडर विक्रम भोसले आणि टीम, अलंकापुरी रेस्क्यू टीम, शिवदुर्ग मित्र रेस्क्यू टीम, बजरंग दल गोरक्षक टीम यांचेही सहकार्य लाभले. गायींचे मालक भानुदास कुंभार यांनी मोहीमेत सहभागी झालेल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या बचावकार्यादरम्यान माजी महापौर नितीन काळजे यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसेविका विनया तापकीर तसेच परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.
दरम्यान, आज राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने आयुक्त शेखर सिंह यांची महापालिका मुख्यालयात भेट घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते. शहरातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेवून करावयाच्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलासह विविध विभागांकडे असलेली उपकरणे आणि साधन सामग्री यामध्ये आणखी कोणत्या अत्याधुनिक उपकरणांची आवश्यकता असावी याबाबत उभयतांमध्ये सविस्तर चर्चा झाली. शहरातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या २५ जवानांची तुकडी शहरात दाखल झाली असून विविध ठिकाणी मदतकार्य करण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात येत आहे.