३०७ सारखे गुन्हे वापस घेतले जाऊ शकतात का?

0
144

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आज मोठं यश मिळालं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्वच महत्वाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर देखील सरकारने जारी केला आहे. या सुधारित जीआरमध्ये कुणबी नोंदी असणाऱ्यांना तसेच त्यांच्या सगेसोयऱ्यांना देखील कुणबी प्रणाणपत्र दिलं जाणार आहे. यादरम्यान वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र आज मनोज जरांगेंना देण्यात आलेल्या जीआरमध्ये नवीन काहीच नसल्याचे म्हटले आहे.

मनोज जरांगे यांनी सगेसोयरेची मागणी केली. मी तुम्हाला पुस्तकातील व्याख्या दाखवली. सगेसोयरे आणि ब्लड रिलेटीव्ह यांच्यात काय फरक आहे? ब्लड रिलेटीव्ह असेल तरच सगेसोयरा असतो. त्यामुळे मला असं वाटतं की, मला गुराखी भाषेतला शब्द वापरायचा नाही. कारण मी गुराखी साहित्याचा अभ्यासक आहे. म्हणजे कढीला उत वगैरे काही म्हणायचं नाही. त्यामुळे यामध्ये नवीन काही आहे असं मला वाटत नाही. सर्वांनी सुखरुप घरी जावं. जरांगेंनी सुखरुप घरी जावं. जरांगेंनी खरंच उपवास केला असेल तर स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ३०७ सारखे गुन्हे वापस घेतले जाऊ शकतात का? अशा गुन्ह्यांना रिपोर्ट फाइल केला जाऊ शकतो का? पोलिसांवरील हल्ल्याचे गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात का? सर्वोच्च न्यायालयाने एसटी महामंडळाच्या बसेस फोडले त्याबद्दल काय निर्देश दिले आहेत? हे मला सांगा. माझ्या गाडीच्या काचा फोडल्या ते पैसे जो आंदोलनाची घोषणा करतो आणि जे सहभागी होतात यांच्या खिशातून वसूल करायचे आहेत. मला वाटत नाही की असे कोणतेही गुन्हे वापस घेतले जाऊ शकतात.

मुंबई उच्च न्यायालयाचा मार्लापल्ले साहेबांच्या जजमेंटनंतर सरकारची ही नोटीस टिकू शकेल असं वाटत नाही असेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले. सोमवारी इत्यंभूत गोष्ट सर्वांसमोर येईल थोडी वाट बघा असेही सदावर्ते यावेळी म्हणाले.