२७४ गावांतून कमळ फुलले, शिवसेनेपेक्षा शिंदे गट वरचढ

0
232

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुका पार पडत असून १६ जिल्ह्यांतील ५४७ ग्रामपंचायतीचे निकाल आज येत आहेत. एकूण ६०८ ग्रामपंचायतीपैकी ६१ ग्रामपंचायतींवर सरपंचाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काल पार पडलेल्या मतदानासाठी ६७ टक्के मतदारांना मतदानाचा हक्क पार पाडला आहे. तसेच आज मतमोजणी सुरू आहे. सत्तांरानंतर शिवसेनेला सहानुभूती मिळत असल्याचे सांगितले जात होते, पण ग्रामपंचातय निकालात कुठेही त्याचे प्रत्यंतर आलेले नाही. उलटपक्षी शिवसेना एकदम चौथ्या-पाचव्या क्रमांकावर गेली असून शिंदे गटाने अपेक्षेपेक्षा मोठी बाजी मारली आहे. पहिल्या क्रमांकावर भाजपाने जवळपास ५० टक्के गावांतून सत्ता घेतली असून त्या खालोखाल राष्ट्रवादी आणि नंतर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस, चौथ्या क्रमांकावर शिंदे गट आणि एकदम खाली पाचव्या नंबरला शिवसेना आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत जनतेने भाजपला कौल दिल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे, निवडणूक कोणतीही असे जनता भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. भाजपला ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये २७४ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान १२८ ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व कायम –
पुणे जिल्ह्यात आज ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या ६१ ग्रामपंचायतीपैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर ५५ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले, या निकालात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनेच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात शिंदे गटाला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे पहायला मिळत आहे.

ग्रामपंचायतीत वर्चस्वाची लढाई असलेल्या आंबेगाव तालुक्यातील एकूण १८ ग्रामपंचायत निवडणुकींचा आज निकाल जाहीर झाला. त्यात १४ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गटाने वर्चस्व मिळवले आहे, तर भाजप आणि शिंदे गटासह शिवसेनेलाही आंबेगाव तालुक्यात जोरदार धक्का बसला आहे.

शिंदे गटाला केवळ तीन ग्रामपंचायतींवर यश मिळाले आहे तर भाजपला केवळ एका ग्रामपंचायतीवर यश मिळवता आले असून शिवसेना आणि काँग्रेसला आंबेगाव तालुक्यात खातेही उघडता न आल्याने शिवसेनेला आणि काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे.