२६ एप्रिलपासून पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमाला

0
353

पिंपरी,दि. २४ (पीसीबी) – गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमाला बुधवार, दिनांक २६ एप्रिल २०२३ ते रविवार, दिनांक ३० एप्रिल २०२३ या कालावधीत चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवड येथे संपन्न होणार आहे. दररोज सायंकाळी ६:३० वाजता व्याख्यानाचा प्रारंभ करण्यात येईल.

बुधवार, दिनांक २६ एप्रिल रोजी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. नितीन शहा ‘जी. एस. टी. सर्वसामान्यांच्या चष्म्यातून’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफतील. गुरुवार, दिनांक २७ एप्रिल रोजी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या घराण्यातील डॉ. शीतल मालुसरे ‘नरवीर तानाजी मालुसरे यांचा अपरिचित इतिहास’ मांडतील. शुक्रवार, दिनांक २८ एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील निवृत्त सचिव डॉ. दि. मा. मोरे ‘नागरीकरण आणि पाणी’ या विषयावर तृतीय पुष्प गुंफतील. योग अभ्यासक हिरामण भुजबळ शनिवार, दिनांक २९ एप्रिल रोजी ‘योग एक जीवनशैली’ या विषयाच्या माध्यमातून चतुर्थ पुष्पाची गुंफण करतील. व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प रविवार, दिनांक ३० एप्रिल रोजी पद्मश्री गिरीश प्रभुणे ‘भारतीय इतिहासातील वंचित घटनांची सुवर्णपाने’ या विषयावर गुंफणार आहेत. त्यावेळी चिंतामणी, क्रांतिवीर चापेकर आणि जिजाऊ पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

बत्तिसाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या जिजाऊ व्याख्यानमालेतील विनाशुल्क व्याख्यानांचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी केले आहे.