‘२५-२५ कोटी दिल्याची चर्चा, एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठेत ? – रोहित पवार

0
2

पुणे, दि. 22 (पीसीबी) : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागू झालेली आहे. या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली जात आहे. यातच पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात नाकाबंदीदरम्यान एका खासगी वाहनातून अंदाजे पाच कोटी रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. ऐन निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम आढळून आल्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

यावरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘२५-२५ कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून यातील एक गाडी सापडली. पण अजून चार गाड्या कुठे आहेत?, हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं”, असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला आहे.

रोहित पवारांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?
“सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून २५-२५ कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगार झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार माध्यमांशी बोलताना काय म्हणाले?
“पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात ५ कोटींची रोख रक्कम पोलिसांकडून जप्त करण्यात आली. ते पैसे सत्ताधारी आमदारांचे असल्याची चर्चा आहे. खेड शिवापूरच्या डोंगरामध्ये आणि झाडांमध्ये ते पैसे पोलिसांना सापडले आहेत. पोलिसांना एकच गाडी सापडली. मात्र, अशा पाच गाड्या होत्या. अंदाज आहे की, २५ ते ३० कोटी रुपये होते. महायुतीने लोकसभेमध्ये पाण्यासारखा पैसा वाटला. आता विधानसभेला महायुतीचे आमदार त्यामध्ये भाजपाचे आमदार असूद्या की शिंदेंच्या शिवसेनेचे किंवा अजित पवारांच्या पक्षाचे आमदार असूद्या. कमीत कमी ५० कोटी रुपये खर्च केला जाईल, अशी चर्चा आहे. आता मलिदा एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीच्या नेत्यांनी खाल्ला आहे, त्यातून काही हिस्सा निवडणुकीत ते वाटणार आहेत”, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे