२३ आणि २४ मार्च रोजी ‘जुही- मेळावा २०२५’चे आयोजन

0
5

चिंचवड मध्ये मेळाव्याचे उद्घाटन तर पुण्यामध्ये बहुभाषी कवयित्री संमेलनाचे आयोजन

नामांकित लेखिकांना ऐकण्याची शहरवासीयांना संधी

पिंपरी, दि . २१ पीसीबी – विश्व-भारती संस्था अहमदाबाद, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य प्रेमी भगिनी मंडळ आणि पुणे गुजराती केळवणी मंडळ यांच्यावतीने येत्या २३ व २४ मार्च रोजी भारतीय लेखिका संमेलन अर्थात ‘जुही- मेळावा २०२५’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने विविध राज्यातील तसेच शहरातील लेखिकांचे विचार ऐकण्याची संधी शहरवासीयांना मिळणार आहे.
विश्व-भारती संस्था, अहमदाबाद तसेच संलग्न विविध संस्थांच्या वतीने विविध शहरांमध्ये ‘भारतीय लेखिका संमेलन अर्थात जुही मेळावा’ आयोजित करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर २३ आणि २४ मार्च रोजी ‘भारतीय लेखिका संमेलन जुही मेळावा’ २०२५ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये रविवार दिनांक २३ मार्च रोजी सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, भाजप युवक प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन विधान परिषदेच्या आम दार उमा खापरे यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्घाटन सत्रात ‘विरायतन’चे संस्थापक व प्रेरणादायी अध्यात्मिक गुरू, पद्मश्री आचार्य चंदनाजी , महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष डॉ.मिलिंद जोशी , कार्यवाह सुनीता राणी पवार, साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या अध्यक्षा अंजली कुलकर्णी , माजी अध्यक्षा डॉ.मंदा खांडगे, पुणे गुजराती केळवणी मंडळ अध्यक्ष डॉ. राजेश शहा, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. धनंजय केळकर, डॉ. मीता देवेंद्र पीर , उद्योजक सुनील मेहता हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना विश्वभारती संस्थेचे सचिव कौशल उपाध्याय म्हणाले कलेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि सामाजिक-सांस्कृतिक प्रगतीच्या उद्देशाने अशा कार्यक्रमांचे संस्थेच्या वतीने आयोजन केले जाते. जुही मेळाव्या अंतर्गत उद्घाटन सत्रात विश्वभारती संस्थेतर्फे डॉ. नियती अंतानी, तत्रू कजारिया, रोनल पटेल, डॉ. निरंजना जोशी, अश्विनी बापट, मना व्यास, राजुल भानुशाली, नीला पाध्ये यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. यासोबतच संस्कृत, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी या चार भाषांमध्ये संपादित श्रीमद भगवद् गीता पंथचे उद्घाटन दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्या हस्ते होईल. यानंतर संगीत सत्रात अहमदाबादचे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉ. फाल्गुनी शशांक हे ‘व्हॉइस ऑफ लता मंगेशकर’ थीम वर आधारित सुमधुर गीते सादर करणार आहेत.
जुही मेळाव्याच्या अंतर्गत २४ मार्च रोजी सकाळी दहा ते एक या वेळेत महाराष्ट्र साहित्य परिषद, सदाशिव पेठ, पुणे येथील सभागृहात गद्य सत्र व बहुभाषिक कवयित्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या गद्य सत्रात मराठीतील आघाडीच्या कवयित्री रुपाली शिंदे कल्पना देशपांडे, स्नेहा अवसरीकर, गुजराती गोपाली बुच, राजुल भानुशाली, जिज्ञा बोरा, यामिनी व्यास गद्य सत्राचे सादरीकरण करतील . बहुभाषिक कवयित्री संमेलनात अंजली कुलकर्णी, संगीता बर्वे, निलिमा गुंडी (मराठी), उषा उपाध्याय, लक्ष्मी डोबरिया, वर्षा प्रजापती, भार्गवी पंड्या, मार्गी दोशी (गुजराती), सुनीता डागा, अलका अग्रवाल, प्रतिभा प्रभा अनिता दुबे (हिंदी) दिव्या देढिया (कच्छी), प्रीती पुजारा (संस्कृत) कविता सादर करणार आहेत.
दरम्यान २४ मार्च रोजी दुपारी दोन ते पाच या दरम्यान गुजराती केळवणी मंडळ, आरसीएम स्कूल, परमार हॉल, गणेश रोड, कसबा पेठ, पुणे येथे मनोरंजक गुजराती कवयित्री संमेलन, गद्य सत्र आणि ओपन माईक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जुही-मेळावा’ २०२५ सर्व कार्यक्रम निशुल्क असून याचा साहित्यिकांनी नागरिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन विश्वभारती संस्थेचे सचिव प्रा. कौशल उपाध्याय यांनी केले आहे.