२२०० किमी पदयात्रा करणाऱ्या कर्तव्यदक्ष पुत्राची प्रेरणादायी कथा”

0
2

दि.21 (पीसीबी) – मालेगाव जवळच्या “गिल पंजाब हॉटेल” चे मालक लकी आबा गिल यांना आज रस्त्याच्या कडेने एक वयस्कर जोडपं पायी जातांना दिसलं. भिकारी दिसणाऱ्या जोडप्याला, दुपार असल्यामुळं, त्यांनी सहजच जेवणाचं विचारलं तर ते नको म्हणाले म्हणून त्यांना १०० रुपये देऊ केले तर ते सुद्धा नको म्हणाले. मग पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही असे का हिंडताय? त्यानंतर सुरू झाला त्यांचा जीवनपट – ते २२०० किलोमीटरचा प्रवास करून आता द्वारकेला स्वतःच्या घरी चालले होते. त्यांनी सांगितले की, “माझे दोन्ही डोळे १ वर्षांपूर्वी गेले होते आणि डॉक्टरांनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही. मग माझ्या आईने डॉक्टरना भेटून ऑपरेशन करायला भाग पाडले व तिने श्रीकृष्ण मंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूरला जाऊन परत द्वारकेला पायी येईल. म्हणून मी आईच्या शब्दासाठी पदयात्रा करतोय.”

मग मी त्यांच्या बायकोविषयी विचारलं तर, “ती पण मला एकटं सोडायला तयार नव्हती व रस्त्याने मी तुम्हाला जेवण तयार करायला येते म्हणून निघाली.” ते २५% हिन्दी व ७५% इंग्रजी बोलत असल्यामुळे त्यांचे‌ शिक्षण विचारलं तर उत्तर ऐकून सुन्न झालो. त्यांनी लंडन येथे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये ७ वर्षे खगोलशास्त्र विषयात पीएचडी केलीय तर त्यांच्या बायकोने मनोविकार शास्त्र या विषयावर लंडन येथेच पीएचडी केलीय. (एवढं शिकून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर गर्वाचा लवलेशही नव्हता. नाहीतर आपल्या कडे १० वी नापास सुद्धा छाती ताणून हिंडतो.) एवढंच नाही तर त्यांनी सी.रंगराजन (गव्हर्नर) व कल्पना चावला यांच्याबरोबर काम केलं होतं व त्यांच्याशी मैत्रीचे संबंध होते.

त्यांना मिळणारे मासिक पेन्शन ते एका अंधांसाठी काम करणाऱ्या ट्रस्टला देऊन टाकतात. सध्या ते सोशल मेडियापासून लांब राहतात. रस्त्याच्या कडेने जाणारं प्रत्येक जोडपं भिकारी असतंच असं नाही. एखाद जोडपं हे आपल्या आईच्या शब्दासाठी प्रभू राम व्हायला तयार होतं. आणि आपल्या पतीसोबत कोणी सीता सुद्धा होतं. म्हणूनच मी आज भेटलेली माणसं ही कलीयुगातील राम-सीताच समजतो.

आम्ही जवळजवळ १ तास गप्पा मारल्या. रस्त्यात उभं राहूनंच. इतके प्रगल्भ विचार ऐकून मन सुन्न झालं. अहंकार गळून गेला आणि वाटलं की आपण उगाचंच खोट्या फुशारकी‌वर जगतो. त्या व्यक्तीच्या बोलण्यातील सहजपणा बघून असं वाटलं की आपण या जगात शून्य आहोत. त्यांचा पायी प्रवास बघून थक्क झालो. प्रवासाला निघून ३ महिने झाले होते आणि घरी पोहचायला अजून १ महिना लागेल.

त्यांचे नाव डॉ. देव उपाध्याय आणि डॉ. सरोज उपाध्याय.