२१ वर्षांत एकही सुट्टी न घेतलेले नरेंद्र मोदी

0
219

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – नरेंद्र मोदी..तब्बल २१ वर्षांपासून सत्तेत. १३ वर्षे मुख्यमंत्री आणि त्यानंतर ८ वर्षे पंतप्रधान. तब्बल दोन दशकांची सत्ता. हल्ली मोदी म्हटलं एक ब्रँड वाटतो. हा ब्रँड सहजासहजी तयार झालेला नाही. 24X7 काम, मेहनत करण्याचं धोरण हे यामागील मुख्य कारण ! नरेंद्र मोदींनी मागील २१ वर्षांपासून एकही सुट्टी घेतली नाही, असं म्हटलं जातं. सध्याच्या राजकारणात अशा प्रकारची विशेष संस्कृती निर्माण करण्यात ते यशस्वी झालेत. तसेच सेवा हेच संघटन हा मूलमंत्रही त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणि राजकीय वाटचालीतील महत्त्वाची पाच वैशिष्ट्ये पाहुयात. या वैशिष्ट्यांच्या आधारेच आज जगात ब्रँड मोदी नावाजला जातोय..

निवडणुकीची रणनीती बदलणं, यश काबीज करणं– २०१४ मध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर भाजपने निवडणुकीची रणनीती बदलली. अनेक वर्षांपासून जिथे भाजपची सत्ता नव्हती, तिथे शर्थीचे प्रयत्न सुरु केले. एकही सुटी न घेता, अखंड काम करण्याची वृत्ती अशा ठिकाणी कामी आली.मोदींच्या याच ब्रँड इमेजमुळे मोदींची लाट आली आणि देशातील बहुतांश राज्यात त्या वेळी कमळ फुललं.

प्रत्येक निवडणूक महत्त्वाचीः भाजपमध्ये एकेकाळी बैठक, भोजन आणि विश्रांती… अशी कामाची पद्धत होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हापासून नेतृत्व स्वीकारलं तेव्हापासून चित्र बदललं. राजकीय कामकाजापासून धोरणांमध्येही मोठा बदल झाला. यामागे एकच विचार होता. प्रत्येक निवडणूक गांभीर्यानं घेणं. याच वैशिष्ट्यामुळे भाजपाने दुसऱ्या पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही विजय मिळवला.

निवडणुकीची तयारी सदैव!– पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणखी एक गोष्ट एखाद्या मिशनप्रमाणे अविरत सुरु ठेवली. एखादी निवडणूक झाली, निकाल आले. त्यानंतरही तिथली निवडणुकीची प्रचार मोहीम कधीही थांबवली नाही. साधारणपणे सगळेच पक्ष निवडणुकीच्या वर्षभर आधीपासून तयारीला लागतात. पण मोदींनी हा ट्रेंड बदलला. निवडणुकीची तयारी हा पक्षाच्या कामांचा महत्त्वाचा भाग ठरला. त्यामुळेच निवडणुकीची तयारी कुठपासून करायची, हाच प्रश्न विरोधी पक्षांना सतावतोय. आज विरोधकांसाठी हे मोठं आव्हान बनलंय.

विरोधकांवर राजकारण करण्याचा दबाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नॉन स्टॉप काम करण्याच्या पद्धतीचा थेट परिणाम विरोधी पक्षांवर दिसून येतो. काँग्रेस हेच एक मोठं उदाहरण आहे. दोन वर्षांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी २४ तास काम करणारा अध्यक्ष हवा, अशी मागणी केली होती. ममता बॅनर्जींसारखे नेते फुलटाइम राजकारणात असतात, हे दाखवण्याचा प्रयत्न करतात.

प्रत्येक कार्यक्रम भव्य, मोठा संदेश– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक कार्यक्रम भव्य असतो. याद्वारे ते एक राजकीय संदेशही देतात. २०१४ ची सुरुवातही त्यांनी एका इव्हेंटने केली. आपण प्रधानसेवक असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. या काळात आरोग्य तपासणी, दिव्यांगांना उपकरण आणि लसीकरण आदी उपक्रम या दिवशी राबवले जातात.