२० जून गद्दार दिन जाहीर करा, खासदार संजय राऊत यांचे युनो ला पत्र

0
278

मुंबई, दि. २० (पीसीबी) – मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला आज बरोबर एक वर्ष पूर्ण झाले. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली होती. आजच्याच दिवशी शिंदे हे आमदारांना घेऊन गुजरातेतल्या सुरत मध्ये गेले होते. या घटनेला २० जून रोजी वर्ष होत आहे. आजच्या २० जून या दिवसाला जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशा मागणीचं पत्र शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी थेट संयुक्त राष्ट्र संघटनेला (युनो) लिहिले आहे.

संजय राऊतांनी पत्रात काय म्हंटलं?

“20 जून 2022 या दिवशी महाराष्ट्र राज्यात विधानपरिषद निवडणूक पार पडली होती. याच रात्री एकनाथ शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेने गेले. एकनाथ शिंदे हे १६ आमदारांसह संपर्काबाहेर गेले, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. उद्धव ठाकरे यांचे सरकार पडून, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एका आमदाराने ५० खोके घेतले, त्यामुळे २० जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा.

आजच्या दिवसाला जागतिक गद्दार दिन म्हणून घोषित केल्यास जगभरातल्याच गद्दारांना एक व्यासपीठ उपलब्ध होईल, युनोन २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा जाहीर केलाय. त्याप्रमाणे २० जून हा जागतिक गद्दार दिन साजरा जाहीर करा, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर शिवसेना ठाकरे गटाकडून जागतिक खोके दिवस पाळला जाणार आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आजचा दिन हा जागतिक खोके दिवस म्हणून साजरा करावा, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं आहे.

राष्ट्रवादीही साजरा करणार गद्दार दिवस –
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तालुकास्तरावर गद्दार दिवस साजरा करा असा आदेश राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. यामुळे गद्दार दिन, खोके दिन, स्वाभिमान दिन या कार्यक्रमामुळे आज दिवसभर राजकारण पेटण्याची शक्यता आहे.