२०८ मतं मिळाल्यावरुन त्यांनी जी खिल्ली उडवली

0
64

मुंबई, दि. 09 (पीसीबी) : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. त्याचप्रमाणे राहुल नार्वेकर उत्तम काम करतील असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर नाना पटोले यांनी भाषण केलं. त्यावेळी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता २०८ मतं मिळाल्यावरुन त्यांनी जी खिल्ली उडवली त्यावरुन टीका केली आहे.

काय म्हणाले नाना पटोले?
“नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला त्याला मी पाठिंबा देतो. आपल्या सभागृहाला खूप समृद्ध अशी परंपरा आहे. भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष आपल्याच सभागृहातून गेले होते असा मान असलेलं हे सभागृह आहे. आपली मागच्या अडीच वर्षांतली कारकीर्द उत्तम होती. त्याचा उल्लेख आत्ता सगळ्यांनीच केला. सभागृहातील दोन्ही बाजूचे सन्मानीय सदस्य हे आपल्या भागांचे प्रश्न घेऊन सभागृहात येतात. सगळ्यांना आपले प्रश्न, जनतेचे प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. आपण कामकाज करताना मागच्या अडीच वर्षांत सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यात तुम्ही ९९ टक्के यशस्वी ठरलात.” असं नाना पटोले म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपद हा काटेरी मुकुट
पुढे नाना पटोले म्हणाले, “विधानसभा अध्यक्ष पद, ती जागा म्हणजे काटेरी मुकुट आहे. त्याची जाणीव मला आहे. सरकारला सांभाळण्यासाठी आपण बसता असं म्हटलं जातं. मात्र विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीचा एक वेगळा मान आहे. त्यावर आरोप, प्रत्यारोप करण्याचा अधिकार कुणालाही नाही. आपल्याकडे जी परंपरा आहे त्या परंपरेला ताकदीने पुढे न्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या राज्याच्या कामकाजाचं कौतुक देशपातळीवर होतं. आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करता यावं यासंबंधीच्या सूचना आपल्याला आल्या आहेत.” असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

२०८ मताधिक्याने निवडून आल्याबद्दल माझी टिंगल करण्यात आली-पटोले
अध्यक्ष महोदय, मी जे २०८ मतांनी निवडून आलो त्याबद्दलची एक टिंगल या ठिकाणी करण्यात आली. मी सांगू इच्छितो की तुम्हाला दोन उपमुख्यमंत्र्यांना एक नंबरचा उपमुख्यमंत्री आणि क्रमांक दोनचा उपमुख्यमंत्री असे नंबर द्यावे लागतील. उपमुख्यमंत्री बोला म्हटलं तर दोघेही उभे राहू शकतात त्यामुळे हे करावं लागेल. मी जे २०८ मतांनी निवडून आलो त्यामुळे माझी खिल्ली उडवली गेली. इथे निवडून आलेला माणूसच बसू शकतो. किती मतांनी निवडून आला ते महत्त्वाचं नसतं. मी पण विदर्भात उच्चांकी मताधिक्याने निवडून आलो आहे. मी आणि देवेंद्रजी आम्ही जेव्हा सभागृहात आलो तेव्हा उच्चांकी मताधिक्याने आलो होतो. उच्चांकी मतांनी निवडून आलो म्हणजे बक्षीस मिळतं असं नाही. हा काही चर्चेचा विषय नाही. मात्र टिंगल केली जाते आहे हास्यकल्लोळ करायचा असेल तर हे काही बरोबर नाही असं नाना पटोले म्हणाले.