‘२०१४ पासून देशाला ग्रहण लागले आहे!’ – अशोक वानखेडे (टायगर)

0
14

शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमाला – पुष्प चौथे

पिंपरी,दि.११ – पासून देशाला ग्रहण लागले आहे; तर महाराष्ट्रात आता पेशवाई सुरू झाली असून विरोधक बेजबाबदार आहेत!’ असे परखड प्रतिपादन दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे (टायगर) यांनी शनिवार, दिनांक १० मे २०२५ रोजी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे केले. जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेत ‘शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, भारतीय संविधान : भारताची दशा आणि दिशा! (नेहरू ते मोदी)’ या विषयावरील चौथे पुष्प गुंफताना अशोक वानखेडे बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे अध्यक्षस्थानी होते; तसेच प्रसाद शेट्टी, बापू गायकवाड, विजय गायकवाड, आर. जी. गायकवाड, मयूर काळभोर, सुप्रिया सोळांकुरे, मुख्य संयोजक मारुती भापकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

मारुती भापकर यांनी प्रास्ताविकातून, ‘व्याख्यानमाला समन्वय समितीच्या वतीने शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमाला चालविण्यात येते. अनेक नामवंत वक्त्यांनी या व्याख्यानमालेत प्रबोधन केले आहे. दिल्लीतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचे विचार ऐकण्याची संधी आज मिळाली. त्या आनंदाप्रीत्यर्थ महात्मा फुले यांची पगडी त्यांना परिधान करून सन्मानित करीत आहोत!’ अशी भावना व्यक्त केली. मानव कांबळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘देशात स्वातंत्र्यापासून सुरू असलेल्या समता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना गेल्या अकरा वर्षांत खीळ बसली आहे. अभिव्यक्तीची मुस्कटदाबी होत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी अशा व्याख्यानांची गरज आहे!’ असे मत मांडले.

अशोक वानखेडे पुढे म्हणाले की, ‘देशासाठी सैनिक लढत असताना शासनाला साथ द्यावी, असे संकेत आहेत; परंतु युद्धबंदी जाहीर झाल्यावर मी सत्तेला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आता वापरू शकतो. राज्यघटनेचा सांगाडा बदलण्याचे प्रयत्न २०१४ पासून सुरू झाले आहेत. सत्तारूढ पक्षाचा एक खासदार जाहीरपणे न्यायपालिकेवर भाष्य करतो. उपराष्ट्रपती यांनी आपल्या पदाची गरिमा ठेवली पाहिजे. बिल्कीस बानोवरील सामूहिक अत्याचार का होतात? त्यातील दोषींची सुटका झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते त्यांचा जयजयकार करतात, ही कोणती मानसिकता आहे? निवडणूक आयोग नि:पक्षपणे काम करीत नाही. शेतकरी वर्षानुवर्ष कर्जबाजारी आहे; कारण सरकार निर्लज्ज आहे. लाडक्या बहिणींना १५०० रुपये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्या खिशातून देत नाहीत. लवकरच आपली श्रीलंकेसारखी अवस्था होणार आहे. निवडणूक आली की पंतप्रधान घोषणा करणार आणि आपण टाळ्या वाजवणार, ही परिस्थिती बदलली पाहिजे. ‘मन की बात’ वाल्यांनी आता जन की बात केली पाहिजे. पहलगाम युद्धाचेही आता राजकीय भांडवल केले जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानातील अधिकार आम्ही वापरणार आहोत की नाही? जर आम्ही सरकारला जाब विचारणार नसलो तर शाहू – फुले – आंबेडकर यांचे नाव घेण्याचा आम्हाला अधिकार नाही!’

दिगंबर बालुरे, राजन नायर, प्रदीप पवार यांनी संयोजनात सहकार्य केले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. नरेंद्र बनसोडे यांनी आभार मानले.