मुंबई, दि. २८ (पीसीबी)- अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलावरील पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा पहिला टप्पा दोन दिवसांपूर्वी वाहनचालकांसाठी सुरू करण्यात आला. मात्र जुहू येथून येणारी वाहने लगतच असलेल्या बर्फीवाला पुलावरून थेट गोखले पुलावरून अंधेरीत प्रवेश करणार होती. या दोन पुलांच्या उंचीमध्ये दोन मीटरचे अंतर राहून जोड न मिळाल्याने जुहू येथून अंधेरीत येणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळालेला नाही. हे अंतर भरून काढण्यासाठी नामवंत संस्थांचा सल्ला घेतला जात आहे.
आधीच गोखले उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी एक वर्ष लागणार असतानाच बर्फीवाला पुलाची जोड देण्यासाठीही एक वर्ष लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गोखले पूल पूर्ण करण्यासाठी तब्बल २०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा भार सहन केला असतानाच आता या खर्चात आणखी भर पडणार आहे.
गोखले उड्डाणपूल हा अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा आहे. या पुलाचा भाग जुलै २०१८मध्ये कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नोव्हेंबर २०२२पासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गोखले उड्डाणपुलाचे पाडकाम पश्चिम रेल्वे, तर पुलाची पुनर्बांधणी मुंबई महापालिकेने केली. रेल्वेवरील आधीच्या गोखले उड्डाणपुलाची उंची ५.७५ मीटर होती आणि हा पूल बर्फीवाला पुलाला जोडला होता. मात्र नवीन पुलाचे काम हाती घेतले आणि रेल्वे हद्दीतील पुलांच्या उंचीचे नवीन धोरण जाहीर झाले. यामध्ये जुन्या पुलांचे पाडकाम करून उभारण्यात येणाऱ्या नवीन पुलांची उंची दीड मीटर वाढवणे अनिवार्य करण्यात आले. त्यामुळे पुलाची उंची दोन मीटरने वाढली. परिणामी बर्फीवाला पुलाला जोड देता आली नाही. गोखले पुलावर गर्डर बसवणे आणि त्यातच बर्फीवाला पुलाला जोड देणे, ही दोन्ही कामे एकाचवेळी करणे पालिकेला शक्य नव्हते. गोखले पूल बंद असतानाच बर्फीवाला पुलाच्या कामासाठी अवजड वाहनांची वाहतूक झाली असती, तर एस. व्ही. रोडवर पूर्णपणे वाहतूककोंडीचा सामना करावा लागला असता. त्यामुळेच बर्फीवाला पुलाच्या जोडणीचे काम आतापर्यंत हाती घेण्यात आले नाही. गोखले उड्डाणपुलाचा उर्वरित टप्पा सेवेत आल्यानंतरच बर्फीवाला पुलाचे कामही त्वरीत सुरू केले जाईल.
असा झाला खर्च
मुंबई पालिका हद्दीतील कामासाठी ११२ कोटी आणि रेल्वे हद्दीतील पुलाचे काम करण्यासाठी ८४ कोटी रुपये असा २०६ कोटी रुपये खर्च गोखले उड्डाणपुलासाठी आला आहे. विविध कारणांमुळे हा खर्च वाढला आहे. एवढा खर्च करूनही बर्फीवाला पुलाला जोड मिळालेली नाही. बर्फीवाला पुलाची दक्षिणेकडील बाजू जून २०११मध्ये आणि उत्तरेकडील बाजू जानेवारी २०१२मध्ये सुरू करण्यात आली होती.पश्चिम रेल्वेकडे रेल्वे हद्दीतील गोखले पुलाचे रेखाचित्र मंजुरीसाठी आले होते. नियमानुसार सर्व तपासणी करून ते आम्ही मंजूर केले. बर्फीवाला पुलाला जोडण्यासंदर्भात आम्हाला मिळालेल्या रेखाचित्रात कुठेही नमूद नाही. मात्र यासंदर्भात पालिकेनेही स्पष्टीकरण दिले आहे.